पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सवय होते. अफूची शेतं जाळून टाकली; पण पुढं काहींनी त्यातही खोटेपणा करून गांजाची तस्करी केली. या कादंबरीची अखेर जमीलाला दगडाच्या वर्षावाने ठार मारण्यात येते. ती शहीद झाली. करीमुल्ला म्हणतात की, “इन्किलाब आणि जिहाद यांच्यामधला उदारमतवादी इस्लामी लोकशाही हाच खरा मार्ग. त्यासाठी नव्याने लढायला तयार झालं पाहिजे. जमीला बेटीच्या हौतात्म्याचा हाच संदेश आहे." अल्लाच्या नावानं एका नव्या जिहादासाठी पूर्वतयारी करायला हवी. रशियन व अमेरिकन संधिसाधू राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर अफगाणी जनतेची होणारी परवड, कौटुंबिक जीवनाची झालेली शोकांतिका या कादंबरीतून प्रभावीपणे व्यक्त होते.

 कादंबरीत दोष नाहीत, असे नाही. तिचा ९०० हून अधिक पृष्ठांचा विस्तार खटकतो. (आणि कादंबरीचे वजनही) तसेच या कादंबरीतील भाषा व विशेषत: संवादांत उर्दू, फारसी शब्दांचा वापर काही वेळा अनाकलनीय व गती रोधणारा ठरतो. आपला वाचक मराठी आहे याचे भान ठेवून आवश्यक तेवढ्याच उर्दू व फारसी शब्दांचा वापर वातावरणनिर्मितीसाठी लेखकाने केला असता, तर तिचे वाचन अधिक आनंददायी झाले असते. काही वेळा तिच्यातील चर्चाही बऱ्याच लांबतात व मग अन्वरचे कुटुंब मध्यवर्ती राहून बाजूला पडते. स्त्री-पुरुष संबंधांची काही वर्णनही खटकतात. ती सूचक असती, तर कादंबरीचा परिणाम मुळीच उणावला नसता!
 अशा काही उणिवा असल्या तरी एका वेगळ्या पार्श्वभूमीवर इतिहास, संस्कृती, राजकारण, समाजजीवन, स्त्री जीवन या सर्वांना कवेत घेऊन 'नरेच केला हीन किती नर' याचा प्रत्यय देणारी ही कादंबरी मराठीत एक महत्त्वाची भर टाकते. भरपूर छायाचित्रे, नकाशे हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

अन्वयार्थ □ २०९