पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवरील शोकांतिका

प्रल्हाद वडेर

 'नरेच केला हीन किती नर' याचा प्रत्यय देणाऱ्या या कादंबरीत रशियन आणि अमेरिकन संधिसाधू राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर अफगाणी जनतेची होणारी परवड, कौटुंबिक जीवनाची झालेली शोकांतिका प्रभावीपणे व्यक्त होते.
  मराठी पुस्तकांना खप नाही, अशी प्रकाशकांची तक्रार असतानाच अलीकडे विश्वास पाटील, मधू मंगेश कर्णिक, गंगाधर गाडगीळ, अरुण साधू अशा काही लेखकांची जाडजूड पुस्तके, कादंबऱ्या प्रकाशित होताना दिसतात. त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ९३३ पानी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या महाकादंबरीचा आता समावेश केला पाहिजे. त्यांचे यापूर्वी तीन कथासंग्रह व दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असल्या, तरी अफगाणिस्तानातील इन्किलाब (क्रांती) आणि 'जिहाद' (धर्मयुद्ध) यावरील कादंबरीनेच यापुढे त्यांची खरी ओळख होईल, यात शंका नाही.

  अफगाणिस्तान गेल्या दशकात तेथील रशियन राजवटीमुळे आणि टोळीवाल्यांच्या गनिमी युद्धाने प्रकाशात आला. रशियाचे विघटन झाल्यावर अमेरिकेने तेथील रशियन राजवट उलथून टाकली आणि मग तालिबानी राजवट संपविली. रशिया व अमेरिका या दोन महासत्तांमधील राजकीय संघर्ष आणि स्वत:चे बाहुले अफगाणिस्तानात सत्तेवर आणून बसविण्याची त्यांची स्पर्धा यामुळे तेथील जनतेची फरफट झाली. त्यातच कडव्या इस्लामी राजवटीमुळे सामान्य जनता व विशेषत: स्त्रिया यांना जी मुस्कटदाबी स्वीकारावी लागली आणि कडव्या मूलतत्त्ववाद्यांनी माणुसकीला न शोभणारे जे अत्याचार केले, त्यामुळे सगळे सुसंस्कृत जग अंतर्बाह्य हादरून गेले. अमीर अमानुल्ला, राजा झहीरशहा, जनरल दाऊदखान, अब्दुल कादीर, नूर महंमद तराकी, बबराक करमाल, हिकमतीयार रब्बानी, मुल्ला ओमर आणि मसूद ही अनेक नावे जगाला परिचित झाली. या सर्वांनी अफगाणिस्तानच्या सुंदर प्रदेशाचा जमेल तेवढा अक्षरश: नरक केला.

अन्वयार्थ □ २०५