पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मार्क्सवादाचे कलम करता येणे शक्य होईल. देशमुखांच्या कादंबरीत दोन्ही विचारप्रणालींकडे सकारात्मकपणे पाहणारी पत्रेही आहेत. खरे मार्क्सवादी स्त्रीपूजक असतात असे एका रशियन मार्क्सिस्टाला ठणकावून सांगणारी जमिला आपल्याला भेटते. तसेच स्त्रियांचा आदर करणारा धर्मनिष्ठ मुसलमान करिमुल्लाही भेटतो.
 इस्लाम वाचवण्यासाठी काम करीत आहोत अशी भूमिका घेणाऱ्या मुजाहिदीन आणि तालिबान यांच्या संघटनांना अफगाणिस्तानात धर्माच्या नावाखाली आपल्याच स्त्रियांवर कसे अत्याचार करतात त्याचा हिशेबच देशमुख या कांदबरीत मांडतात. इस्लामप्रमाणे आचरण करण्याचा आग्रह धरणाऱ्या या धार्मिकांचे स्वत:चे वर्तन इस्लामशी कितपत सुसंगत आहे असा प्रश्न त्यामुळे आपोआपच उपस्थित होतो.
 शेवटी कोणत्याही संस्कृतीचे मूल्यमापन करण्याची महत्त्वाची व निर्णायक कसोटी या कांदबरीतून हाती लागते ती म्हणजे त्या संस्कृतीत स्त्रीला कोणत्या प्रकारची वागणूक मिळते. संस्कृतीच्या संघर्षात आपण कोणाची बाजू घ्यायची हे ठरवताना देखील याच कसोटीचा उपयोग केला जावा असा संदेशही वाचकांपर्यंत अप्रत्यक्षपणे पोहोचतो. जिहादच करायचा असेल तर तो 'इन्किलाबसाठी' का करू नये असा प्रश्नही त्यांच्या मनात निर्माण होतो. आणि त्यातच या कादंबरीचे यश आहे.

२०४ □ अन्वयार्थ