पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवाहाबरोबर वाहवत जावे लागते!
 धार्मिक मुद्द्यांबरोबरीने राजकीय संस्कृतीचाही विचार करावा लागतो. कादंबरीत जाता जाता का होईना परंतु गंभीरपणे केलेल्या पंडित नेहरूंनी आखलेल्या अलिप्ततावादी धोरणाचा उल्लेखही कौतुकाने करण्यात आलेल्या आहे. त्याच्याशी अफगाण सत्ताधीशांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना करता येण्यासारखी आहे. या धोरणाला 'बेतर्फी' असे नाव देऊन त्याचे समर्थन करणारी पात्रे कादंबरीत आहेत. हे धोरण आणि नेहरूंचा अलिप्ततावाद यांच्यात मूलभूत फरक आहे. 'बेतर्फी' धोरणात दोन्ही बाजूंना झुलवत ठेऊन त्यांच्याकडून सारखेच फायदे उपटण्याची चलाखी अनुस्यूत आहे. अलिप्ततावादात दोन्ही सत्तांना सारख्याच अंतरावर ठेवण्याचे व प्रसंगी त्यामुळे होणारे नुकसान सोसण्याचीही तयारी आहे.

 देशमुखांच्या कादंबरीचा विस्तार कादंबरी या वाङ्मय प्रकाराला साजेसाच आहे. पण तो अधिक होऊ नये या व्यवहारिक कारणांसाठी त्यांना अनेक महत्त्वाचे मुद्दे केवळ स्पर्श करून सोडून द्यावे लागले आहेत. धर्माला विरोध करण्याचा, त्याला अफूची गोळी मानणाऱ्या मार्क्सवादी विचारधारेचे स्वरूपही उत्तरकालीन मार्क्सवादी भाष्यकारांमुळे इस्लामसारखाच कर्मठ धर्माप्रमाणे बंदिस्त झाले याचे सूचन कादंबरीत आढळते. त्याला निराश्वरवादी धर्म म्हणणे त्याच्या पाठिराख्यांना आवडणार नाही, पण ते एक प्रकारची धर्मप्राय श्रद्धाच बनली असे म्हणण्यास हरकत नाही याउलट भांडवलशाही विचार हा खुला व समावेशक राहिल्याने तो परिस्थितीला प्रतिसाद देत सतत बदलत राहिला. कालमानाप्रमाणे व परिस्थितीच्या रेखाट्याने अनावश्यक, ओझे ठरू शकणाऱ्या गोष्टींना टरफलाप्रमाणे फेकून देत त्याने आपला गाभा अबाधित ठेवला. नवनवी रूपे धारण केली. मार्क्सचा 'कॅपिटल' ग्रंथ कम्युनिस्टांसाठी कुराणाप्रमाणेच धर्मग्रंथाइतका प्रमाण ठरला. त्यांनी त्याची जणू पोथी केली. तसा प्रकार भांडवलशाहीने ना अॅडम स्मिथच्या बाबतीत केला, ना केन्सच्या. भांडवलशाहीचे रूप प्रवाही राहिले. तिच्या प्रवाहीपणाची नीट दखल घेण्याऐवजी त्याच्याकडे फसवेपणा म्हणून पाहिले गेले. खरे तर एकीकडे धर्माच्या विरुद्ध मानल्या गेलेल्या मार्क्सवादात धर्माचे मूलभूत कार्य करण्याची क्षमता आहे हे लक्षात घेतले गेले नाही मार्क्सवादाचे हे सहसा अपरिचित राहिलेले रूपही देशमुख दाखवून देतात. ते रशियन तान्याच्या (ऊर्फ अफगाणी तराणा) तोंडून, "या उच्च प्रतीच्या बुद्धीला मी धार्मिक न म्हणता नैतिक म्हणेन. जी समतेची स्वप्नं पाहणाऱ्या व ती साकार करणासाठी धडपडणाऱ्या माणसात जरूर असते. त्या माणसांच्या बुद्धीचं समाधान करण्याचं सामर्थ्य मार्क्सवादात आहे. स्वत:च्या पलीकडे असलेल्या तत्त्वाशी एकरूप होऊन निसर्गाशी वा इतर माणसांशी संवादाचं नातं

२०२ □ अन्वयार्थ