पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नोंद घेण्यास देशमुख विसरत नाहीत. भारतातील इस्लामी सुधारक अशगर अली इंजिनियर यांचा व त्यांच्या दृष्टिकोनाचा ते आदरपूर्वक उल्लेख करतात. कादंबरीतील स्त्री (मुक्ती) वादी अनाहिता कुराणामधील आयतांच्या आधारेच स्वत: महंमद स्त्रीपुरुष समानतावादी होते असे पटवून देण्याच्या प्रयत्नात असते. तिच्या दृष्टिकोन ऐतिहासिक आहे. महंमदानंतर "इस्लामी समाज सरजामी वृत्तीच्या पर्शिया व बायझंटाइन समाजाच्या प्रभावाखाली आला. हे समाज इस्लामपूर्व जाहिलिया काळापासून पुरुषप्रधान समाजरचनेचं अनुकरण करणारे होते आणि त्याचे पुरुष अनुयायी क्रांतिकारी आणि पुरोगामी नव्हते. त्यामुळे कुराणाचं भाष्य करताना त्यांनी पुरुषांना झुकतं माप दिलं. स्त्रीसाठी प्रेषितांनी जे दिलं ते चुकीच्या व तात्कालिक संदर्भात लागू करणारं भाष्य करीत स्त्रीला दुसऱ्या व तिसऱ्या हाजरा शतकात चार भिंतीआड जेरबंद करण्यात हनाफी परंपरेच्या भाष्यकरांना यश मिळालं."
 अनाहितासारख्या मुक्त स्त्रीकडून असले विचार समजून घेण्याच्या मन:स्थितीत अफगाणी पुरुष कसे असणार? म्हणून इस्लामचे काटेकोरपणे पालन करणारे करीमल्लासारखा पंडितही देशमुख रंगवतात. करीमुल्ला पवित्र कुराणाचा हवाला देऊन सांगतो की "इस्लामनं स्त्री-पुरुषांच्या नात्याला समानता बराबरी बक्क्ष केली आहे. एका आयतीत म्हटलंय की, स्त्री-पुरुष दोघंही एकाच नफ्स जिवंत हस्तीपासून बनलेले आहे. म्हणून एक दुसऱ्यापेक्षा वरचढ नाही. माझ्या मते ही आयत समानतेचा पाया आहे. या भूमिकेमुळेच करीमुल्लाला पत्नीला तलाक देणे मान्य नाही. दिव्य कुराणानं तलाक ही अबगाज अल मुबाहत' म्हणजे परवानगी असलेली पण सर्वांत वाईट व नापसंत असलेली कृती मानली आहे."

 करीमुल्लाच्या विवेचनाचा अर्थ असा होतो की प्रेषितांनी अपवाद म्हणून केवळ मुभा दिलेल्या कृतीला उत्तरकालीन पुरुषवर्चस्ववादी लोकांनी जणू नियमच बनवून टाकले.
 करीमुल्लासारख्या पात्रामुळे देशमुख इस्लाममधील आणि विशेषत: तेव्हाच्या अफगाणी मुसलमानांमधील आंतरिक संघर्ष टिपण्यात यशस्वी झालेले आहेत. आधुनिक पाश्चात्त्य (आधुनिक) साम्यवादी आणि इस्लाम अशा तीन सांस्कृतिक विश्वांमधला संघर्ष उभा करताना देशमुख इस्लाममधीलच दोन प्रवाहांमधील संघर्ष दाखवायला विसरत नाहीत हे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाची बाब अशी, की दोन जबरदस्त व प्रभावी आधुनिक विचारधारांच्या दबाव-दडपणाखाली इस्लाममधील अंत:संघर्ष दडपला जातो व कुराणाच्या आधारे इलाममध्ये सुधारणा करण्याची इच्छा असणाऱ्यांनाही इस्लामच्या रक्षणासाठी शेवटी कर्मठ, प्रतिगामी विषमतावादी

अन्वयार्थ □ २०१