पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वर्णनही येते.
 बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेला शह द्यायचा असेल तर तोडीस तोड ठरू शकणाऱ्या रशिया या दुसऱ्या महासत्तेशी संधान बांधायला हवे हे अमानुल्लाने ओळखले होते. म्हणूनच ब्रिटिशांना त्याच्याशी जुळवून घ्यावे लागले. साहजिकच अमानुल्ला हाच विसाव्या शतकातील नव्या अफगाणी राजकरणाचे प्रेरणास्थान ठरला.
 लेखनात वा चर्चेत पण 'अफगाणिस्तान, अफगाणी' अशा प्रकारचे शब्द प्रयोग सररास करीत असले तरी वास्तवात अफगाण समाज हा वेगवेगळ्या टोळ्यांनी बनलेला आहे. त्या प्रत्येक टोळीचे रीतीरिवाज वगैरे एकमेकांपेक्षा वेगळे असतातच. परंतु त्यांची एकमेकांशी स्पर्धा असते व एक टोळी दुसऱ्या टोळीच्या वर्चस्वाखाली नांदायला तयार नसते. या वांशिक भेदाचाही परिणाम अफगाणिस्तानच्या राजकारणावर आणि राजकीय संस्कृतीवर झाला असल्याचे भान देशमुखांना आहे. अर्थात असे असले तरी त्या सर्वांचा धर्म एकच, म्हणजे इस्लाम; पंथही एकच म्हणजे सुनी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांना सारखेच स्वारस्थ असलेल्या तीन गोष्टी म्हणजे झर (सोने) झन (बाई) आणि जमीन या तीन वस्तूंसाठी त्यांची धडपड चालू असते. अशा परिस्थितीत त्यांचा एक एकसंध राजकीय समाज बनवणे, राजकीय संस्कृतीची निर्मिती करणे किती अवघड आहे याची कल्पना यावी. जे काही ऐक्य वगैरे दिसून येते त्याचे कारण इस्लाम धर्म आहे. कारण इस्लाम हा एक सर्वंकष धर्म आहे. जीवनाची खाजगी आणि सार्वजनिक, ऐहिक आणि पारलौकिक अशी सर्व अंगे त्याने व्यापिली असून तो त्याचे नियंत्रण करीत असतो. कुराण हा त्यांचा फक्त धर्मग्रंथच नसून तो कायद्याचा म्हणजे शरीयतचाही मुख्य आधार आहे. जर काही संदिग्धता किंवा उणीव जाणवली तर ती महंमद पैगंबरांच्या आयुष्यातील बोधदायक प्रसंगांनी (हदीस) भरून काढली जाऊ शकते. कुराणातील ईश्वरी वाणी आणि हदीमधील पैगंबरचारित्र्यातील अनुकरणीय आदर्श यांनी इस्लामी कायदा परिपूर्ण होतो. शिवाय स्वत: महंमद हे ईश्वराचा संदेश मुनष्यजातीपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रेषितांमधील अखेरचे प्रेषित असल्यामुळे या कायदा आता अंतिम ठरत आहे. त्याच्यात कोणत्याची परिवर्तनाची, सुधारणेची गरज नाही व तशी शक्यताही नाही. तसे करायचा कोणी प्रयत्न केलाच तर त्यांना धर्मद्रोही ठरवणे हे अगदीच सोपे आहे.

 इस्लामची अशा प्रकारची मांडणी हा खरे तर इस्लामचा मुख्य प्रवाह आहे. .यापेक्षा वेगळे काही म्हणणारे अस्तित्वात नाहीतच असे नाही, परंतु त्यांचा आवाज अत्यंत क्षीण असल्याने तो दडपून टाकणे अवघड नसते. तरीसुद्धा या प्रवाहाची

२०० □ अन्वयार्थ