पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजांनी नेपोलियनचा पराभव करून दाखवून दिली हे खरे असले तरी इंग्रजांचा मार्ग पूर्णपणे निर्वेध झाला होता असे म्हणता येत नाही. त्यांना शह देऊन आपण .
 साम्राज्यविस्तार करण्यास झारच्या ताब्यातील रशिया सिद्ध होता. आणि मुख्य मुद्दा हा होता त्यासाठी रशियात त्याच्या हद्दीला हद्द लागून असलेल्या अफगाणिस्तान या राज्याच्या उपयोग होणार होता. तो होऊ न देण्यात इंग्रजांचे यश होते. म्हणून अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच ब्रिटिशांचे लक्ष अफगाणिस्तानावर नियंत्रण ठेवण्याकडे लागले. त्यासाठी त्यांना अफगाणिस्तानबरोबर तीन युद्धे करावी लागली. त्या तपशिलात जायचे कारण नाही परंतु साम्राजपिपासू सत्तांच्या संघर्षात अफगाणिस्तान पाहिल्यापासूनच कसा भरडला जात होता हे यावरून लक्षात येईल. या संघर्षातील आधीचे प्रतिस्पर्धा होते रशिया आणि ब्रिटिश. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनची जागा अमेरिकेने घेतली. अफगाणिस्तानचे भरडले जाणे चालूच राहिले.
 'इन्किलाब' च्या प्रारंभी अँग्लो अफगाण संघर्षातील शेवटच्या पर्वाचा उल्लेख करून देशमुखांनी इतिहास आणि कलात्मकता यांचे औचित्य साधले आहे. विवेकाने येणारी आधुनिकता आणि धर्माने येणारी गतानुगतिकता यांच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या या कादंबरीत ब्रिटिशांना शह देणाऱ्या आणि त्यासाठीच अफगाणिस्तानचे आधुनिकीकरण करून पाहणाऱ्या अमानुल्ला या अमिराचे कर्तृत्व सांगितले गेले आहे. त्याच्या या कर्तृत्वाचे वर्णन करणारे एक पुस्तकच तेव्हाचे पत्रकार श्री. रा. टिकेकर यांनी लिहिले होते, 'सिंहाला शह' हे त्याचे नावच त्याची समर्पकता सूचित करते. सिंह हे तेव्हाच्या ब्रिटिश सत्तेचे प्रतीक समजले जात होते. अमानुल्लाने आपले सामर्थ्य वाढवून अफगाणिस्तानला राजकीय सार्वभौमत्व प्राप्त करून दिले. तो रशियाच्या मदतीने हिंदुस्तानवर स्वारी करणार आहे अशी हवा तेव्हा निर्माण झाली होती आणि त्यामुळे येथील ब्रिटिश सत्ताधारी हवालदिल झाले होते.
.  कादंबरीकाराच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुर्कस्तानाचा सत्ताधीश कमाल पाशा अतातुर्क याने आपल्या देशाच्या आधुनिकीकरणाची सुरुवात करण्यापूर्वीच अमानुल्लाने ही प्रक्रिया अफगाणिस्तानात राबवण्याच्या प्रारंभ केला होता. ब्रिटन, रशिया यांच्यासारख्या पाश्चात्त्य शत्रूना तोंड द्यायचे झाल्यास त्यांच्यासारखेच आधुनिक होण्याशिवाय पर्याय नाही हे त्या राजाने ओळखले होते. पण कमाल पाशाला यश मिळाले तर अमानुल्ला अपयशी ठरला. 'स्वातंत्र्य आणि समते'चा पुरस्कार करणाऱ्या या अमीराला नेमक्या याच कारणामुळे पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आयुष्यातील अखेरची तीस वर्षे इटालीमध्ये अज्ञातवासात काढून तो १९६० मध्ये मरण पावला. कादंबरीच्या प्रारंभीच त्यांच्या मृत्यूची खबर आणि त्याचा दफनविधी त्याच्याच इच्छेनुसार अफगाणिस्तानात कसे केले जाते याचे

अन्वयार्थ □ १९९