पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साम्यवादी संप्रदाय एकाच पाश्चात्त्य विचारधारेचे दोन प्रवाह असल्याने त्यांच्यातही अनेक गोष्टी समान आहेत. खाजगी संपत्तीचा हक्क हा कळीचा मुद्दा सोडला तर हे साम्य कोणाच्याही लक्षात यावे असेच आहे.
 परंतु देशमुखांच्या कादंबरीच्या आणि एकूणच इस्लामच्या संदर्भात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कम्युनिस्टांची म्हणजे साम्यवादी विचारसरणी पूर्णपणे निरीश्वरवादी आणि धर्म नाकारणारी आहे. याउलट पाश्चात्त्य उदारमतवादी लोकशाहीत निरीश्वरवाद्यांना शत्रू न मानता ईश्वरावर निष्ठा ठेवायची तरतूद आहे. तीच गोष्ट धर्माची. ही विचारधारा धर्मस्वातंत्र्य मानते. त्यात निधर्मी असण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश होतो.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या देशमुखांच्या कादंबरीतील संघर्ष तिपेडी आहे. तेथे पाश्चात्त्य युरोअमेरिकन, कम्युनिस्ट आणि इस्लामी अशा तीन विचारधारा समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत.
 आता हटिंग्टन आणि देशमुख यांच्यात लेखनाच्या व्याप्तींची तुलना केली तर काय दिसते? जगातील विविध संस्कृतींचे विश्लेषण करताना हटिंग्टननी काही ऐतिहासिक संदर्भ दिले असतील, परंतु त्यांच्या विवेचनाचा रोख भविष्यलक्ष्यी आहे. देशमुखांच्या कादंबरीच्या कथानकाच्या कालाची व्याप्ती स्थूलमानाने लगतच्या म्हणजे साधारणपणे शंभर वर्षांचा इतिहास एवढ्यापुरती मर्यादित आहे.
 हटिंग्टन यांचे सामाजिक व राजकीय विश्लेषण संस्कृती या कॅटेगरीच्या चौकटीत केले गेलेले असल्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य आचार-विचार, शैली आणि इस्लामिक (व अन्यधर्मीय युद्धा) आचार-विचार, शैली यांना एकाच पातळीवर ठेवले आहे. जरी इस्लामिक जीवनशैली ही धर्मकेंद्रित, ग्रंथाधारित आणि श्रद्धायुक्त असते. याचा पद्धतीच्या अवलंब करून कम्युनिस्टांच्या आचारविचारांना अर्थात जीवनशैलीत एक वेगळी संस्कृती समजून घटना समजावून घेतल्या त्यांचे विवेचन केले तर त्यात गैर काहीच नाही. मला वाटते देशमुख नेमके हेच करतात. एक बाजूला पाश्चात्त्य संस्कृती आणि साम्यवादी संस्कृती ही एकाच पाश्चात्य आधुनिकेतेची दोन रूपे आणि दुसऱ्या बाजूला मध्ययुगीन आचार-विचारांचा आग्रह धरणारी इस्लामी संस्कृती यांच्या त्रिकोणमितीचे हे ललित अंगाने केलेले आकलन व घडवलेले दर्शन आहे. त्यात एक संघर्ष अमेरिका नियंत्रित पाश्चात्त्य संस्कृती आणि रशियन नियंत्रित साम्यवादी संस्कृती यांच्यामधील आहे.

 दुसरा संघर्ष साम्यवादी संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांच्यामधील तर तिसरा संघर्ष अधार्मिक (न - धार्मिक) मानल्या गेलेल्या भोगविलासवादी पाश्चात्त्य संस्कृती आणि इस्लामिक संस्कृती यांच्यातील आहे. या संघर्षांमधील शत्रुमित्रांची

अन्वयार्थ □ १९५