पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रीतीने रेखाटले आहे.
 ही ऐतिहासिक कादंबरी आहे आणि जहीर शहाच्या राजवटीत पंतप्रधान असणारे दाऊदखान, कट्टर मार्क्सवादी तळातून वर आलेले, शेतकऱ्यांबद्दल अपार सहानुभूती असलेले कम्युनिस्ट नेते, आणि प्रभावी लेखक नूर महंमद तराकी, बुद्धिमान; विचारवंत आणि राजकीय डावपेच उत्तम जाणणारे आणि कुशलतेने डावपेच करणारे, हमिनुल्ला अमीन सर; आकर्षक व्यक्तिमत्त्व, अमोघ वक्तृत्व आणि कडवी मार्क्सवादी भूमिका असणारे तरुण बाबरक करमाल या व्यक्तिरेखांचे देशमुख यांनी ऐतिहासिक सत्याचा यत्किंचितही विषर्यास न करता, प्रभावी चित्रण केले आहे. या कादंबरीत अनेक स्त्रियांच्या जीवनाची कहाणी आहे. त्यांच्यापैकी सलमाची कहाणी मनाला चटका लावणारी आहे. ही इतिहासावर आधारलेली कादंबरी आहे. इतिहासातील घटनाचक्र आणि इतिहासात प्रामुख्याने वावरणाऱ्या नेत्यांचे उदय आणि अस्त यांचे चित्रण नाट्यपूर्ण आणि चित्तवेधक आहे. परंतु या कादंबरीचे सौंदर्य अन्वर, करिमुल्ला, सलमा आणि जमिला यांच्या जीवनातील सुखदु:खे, त्यांच्या मनातील वादळे आणि इतिहासाचे गतिचक्र वेगाने फिरत असताना त्यांच्या जीवनाची झालेली शोकात्मिका यामध्ये आहे. अन्वरला अफगाणिस्थानमध्ये रशियन राज्यक्रांतीप्रमाणे क्रांती व्हावी असे वाटते. त्याला श्रमिकांच्या दुःखाबद्दल सहानुभूती आहे. त्यांच्याच घरात शेतमजूर म्हणून राबणाऱ्या इस्माईलला तो शक्य ती मदत करतो. पुढे अनेक दिवस शेतकऱ्यांमध्ये काम करून प्रगतीचा मार्ग शोधतो. परंतु हे करताना तो अमीन सर, नूर महंमद तराकी आणि करमाल यांच्या नेतृत्वामागे वेळोवेळी फरपटत जातो. शेवटी तालिबानांचा विजय झाल्यामुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त होते. ही एका उदारमनस्क आणि ध्येयवादी व्यक्तींची शोकांतिका आहे. करिमुल्ला यांना कम्यूनिझमचा व्हावा इस्लामी राजवट यावी असे वाटत होते. तालिबानची इस्लामी राजवट येते परंतु ती करिमुल्लाच्या अनेक अपेक्षा भग्न करणारी असते. त्यामुळे करिमुल्ला स्वत:च्या मनाला विचारीत असणार, 'मी जिंकलो की मी हरलो?' धर्माच्या उदात्त आशयाशी एकरूप झालेल्या श्रद्धाळू व्यक्तीची ही शोकांतिका आहे. सलमाच्या जीवनातील दुःखाची मोजदाद करणेही शक्य नाही. काही माणसे नियतीच्या हातची खेळणी असतात. अशीच होती दुर्दैवी सलमा. तिच्या राजकीय स्वप्नांच्या ठिकऱ्या उडाल्या आणि तिला कॅन्सरही झाला. अखेर तिची जगण्याची इच्छाच आटून गेली आणि मृत्यूने जणू तिला विश्रांती दिली. सलमाच्या दुर्दैवाच्या दशावतारामुळे वाचकाचे मन कळवळेल.

 जमिलाची कहाणी वेगळी आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार काव्यातून होतो आणि तिला जो समाजवादी विचार भावला त्याच्या यशासाठी लढताना,

अन्वयार्थ □ १८७