पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पश्चिमात्य शिक्षण घेतलेला आहे. दुसरा प्रवाह हा रशियाच्या प्रभावामुळे डावीकडे झुकलेला आणि समाजवादी विचारसरणीकडे आकृष्ट झालेला आहे. तिसरा प्रवाह इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा आहे आणि विशेष म्हणजे अनेक सुशिक्षित तरुणांमध्ये इस्लाम पुनर्जीवनवादाच्या प्रेरणा प्रबळ आहेत. इलियास पुढे म्हणाले, “धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा प्रवाह वाढत जाईल हे सांगायला भविष्यवेत्त्यांची गरज नाही." येथपर्यंत ज्याप्रमाणे अफगाणिस्थानमधील राजकीय संघर्षाचे स्वरूप स्पष्टपणे मांडले आहे त्याचप्रमाणे पहिल्या तीन प्रकरणांत कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखांचेही ठसठशीत चित्रण केले आहे. अन्वर हा रशियात शिक्षण घेऊन, रशियन स्त्रीशी विवाह करून परत काबूलला येऊन तेथील विद्यापीठात शिकवू लागला होता. अन्वर बुद्धिमान आणि उमदा आहे. त्याची डाव्या विचारांशी प्रथम ज्यांनी ओळख करून दिली त्या अमीन सरांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. तरुण कम्युनिस्ट नेता करमाल यांच्याबद्दल त्याला आकर्षण वाटत असले तरी अमीनसरांच्याबद्दल त्याच्या मनात गाढ प्रेम, किंबहुना भक्तीची भावना आहे. अन्वर विचाराने मार्क्सवादी असला तरी कुटुंबीयांच्यात त्याच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्यांना दुखावणे त्याला फार कठीण जाते. त्याच्या रशियन पत्नीने स्वखुशीने इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे अन्वरची घराशी ताटातूट होत नाही. अर्थात त्याचे विचार आणि वागणे त्याच्या वडिलांना मुळीच मान्य नव्हते. अन्वरच्या मनात विचारांबद्दल द्वंद्व नसले तरी तो सरळ मार्गाने जाणारा असून भावनाप्रधान, कोणातरी नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होणारा आहे हे लक्षात येते. करिमुल्ला ही या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा, त्यांनी अल अझर या इजिप्तमधील इस्लामिक विद्याकेंद्रात दीर्घकाळ राहून धर्माचा अभ्यास केला आणि नंतर ते काबूल विद्यापीठात इस्लामी धर्मशास्त्राचे विद्याप्रमुख आणि प्राध्यापक झाले. त्यांनी ताश्कंद आणि बुखारा येथे जाऊन तेथील भौतिक प्रगती आणि आधुनिक जीवन यांचे निरीक्षण केले होते. करिमुल्ला हे चारित्र्यवान, बुद्धिमान असून इस्लामचे कट्टे समर्थक असतानाच इस्लामच्या मानवतावादी स्वरूपाबद्दल होणारे हल्ले त्यांना अमान्य होते. काबूल विद्यापीठाच्या सिनेटवर डॉ. अनाहिता या स्त्री प्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांच्या अभिनंदनाच्या सभेतील भाषणात करिमुल्ला यांनी त्यांचा स्त्रीबद्दलचा उदार दृष्टिकोन सांगताना इस्लामचीच ही दृष्टी आहे असे प्रतिपादन केले आणि त्याचवेळी कम्युनिझमला असलेला त्यांचा प्रखर विरोधही स्पष्टपणे मांडला. इस्लाम ही सर्वश्रेष्ठ उदात्त जीवनपद्धत आहे असे सांगतात. त्यांच्या मनात मूळ वाळवंटी अरेबिक जीवनपद्धती आणि आधुनिकतेशी इस्लामची सांगड घालणारा तुर्की समाज यांची तुलना सुरू झाली की ते अस्वस्थ होत. या उदार-मनस्क धर्मपंडिताचे व्यक्तिमत्त्व लक्ष्मीकांत देशमुख यांनी अत्यंत मार्मिक आणि कलापूर्ण

१८६ □ अन्वयार्थ