पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



असले तरी या प्रश्नाचे भावनात्मक (वा निवेदनात्मक) चित्रण झालेले नाही.

 या कादंबरीत नगरपालिका अधिकारी म्हणून आलेले भांगे यांची व्यक्तिरेखाही लालाणींइतकीच महत्त्वाची आहे. ते कुशल प्रशासक तर आहेतच पण नोकरशाहीत निर्माण झालेल्या दोषांपासून मुक्त आहेत. भ्रष्टाचार, कामचुकारपणा, सत्तेसाठी कायदेकानून धाब्यावर ठेवून वागण्याची तयारी, नेत्यांच्या मर्जीसाठी जनहिताला तिलांजली देऊन मन मानेल तसे वागण्याची पद्धत या सर्व दोषांच्या विरोधात ते उभे आहेत. आपण ज्या गावात वाढलो, मोठे झालो त्या गावात काही चांगली कामे करण्याची त्यांची मनःपूर्वक इच्छा आहे. पण त्यांची अवस्था चक्रव्यूहाचा भेद करून आत गेलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. नेते, नगरसेवक, कामगार या सर्वांविरुद्ध त्यांना सचोटीच्या भूमिकेसाठी जबर किंमत द्यावी लागते. दुःखाची गोष्ट ही, की लालाणीसारखा नगरपालिकेचा काही चांगली कामे करू पाहणारा अध्यक्षही आपली खुर्ची सांभाळण्यासाठी जाणूनबुजून भांगे यांच्याविरुद्ध भूमिका घेतो. भांगे यांची बदली होते. यात नगरसेवकांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या सर्वांचा जाणता - अजाणता हात असतो. आजही शासनाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या थोड्याशा उत्तम प्रशासकांचे भांगे प्रतिनिधित्व करतात. लोकशाहीच्या या चौकटीतल्या प्रशासनात, राजकारण्यांत, नेतृत्वात किमान कुवतीची माणसे कशी वरचढ ठरतात आणि जनहिताची खरी कळकळ असणारे सचोटीचे लोक कसे दूर फेकले जातात याचे प्रत्यंतर ही कादंबरी देते. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडे भाषेचे आगळे सामर्थ्य नाही. त्यांनी जो विषय घेतला आहे, त्यासाठी त्याची फारशी जरुरीही नाही. पण व्यक्तिचित्रे अधिक भेदक करण्यासाठी, वर्णनाचे चित्रमूल्य अधिक वाढवण्यासाठी, संवादातील सामर्थ्य अधिक धारदार करण्यासाठी शब्दसामर्थ्याची जरूर असते. देशमुखांची शैली काहीशी डॉक्युमेंटरी स्वरूपाची वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातील माणसांच्या प्रेरणा आणि प्रवृत्ती कशा अध:पतनाच्या मार्गावर घसरत चाललेल्या आहेत, माणसाचा स्वभाव भ्रष्ट होत जात आहे, त्यांच्यातील संवेदनशीलता कशी बधिर होत आहे याचे समर्थ चित्र देशमुखांनी काढले आहे. राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार करणारी ही एक लक्षणीय कृत्ती आहे. अतिशय वस्तुनिष्ठ दृष्टीने राजकीय-सामाजिक वास्तव रेखाटणाऱ्या कादंबऱ्या मराठीत तशा कमी आहेत. त्यात देशमुखांची कादंबरी खूपच आशा निर्माण करणारी आहे.

अन्वयार्थ □ १८३