पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वभाव, आस्थाविषय व लेखनसामर्थ्येचा याचा धांडोळा विविध अभ्यासकांच्या लेखनातून साकार झालेला आहे. देशमुख यांचे कथात्म साहित्य व प्रशासकीय लेखनाचे वेगळेपण, त्यामधील अंत:सूत्रे याची चर्चा या ग्रंथात आहे. रोमँटिक संवेदनेपासून समाजवृत्तातपर विषयाचा आलेख देशमुख यांच्या साहित्यात आहे. थीमबेस्ड स्वरूपाच्या तीन कथामाला त्यांनी लिहिल्या. अनेक नवे विषय कथाकादंबरीत प्रवेशित केले. सामाजिक जीवनाची इतिवृत्ते त्यांच्या लेखनात आहेत. समस्याप्रधान कथा म्हणून या कथारचिताला वेगळे असे मूल्य आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न ते स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या विषयावरील कथामाला या ललित दस्तऐवज म्हणून पाहता येतात. तर हरवलेले दिवस ही बालमजुरांच्या प्रश्नावरील मराठीतील एकमेव कादंबरी असावी.
 देशमुख यांच्या कथात्म साहित्यातून मोठ्या प्रमाणात राजकीय जाणिवांचे चित्रण आलेले आहे. स्थानिक स्वराज्यसंस्थेपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा नकाशा त्यांच्या लेखनात आहे. सत्तास्पर्धेतील डावपेचांचे, ढासळत्या मूल्यदृष्टीचे वेगळे असे भान त्यांच्या लेखनात आहे. राजकारणाच्या या सामूहिक समाजदर्शनाचा पट निर्माण करण्यासाठी सारा समूहच त्यांनी कादंबरीच्या केंद्रस्थानी आणला. अंधेरनगरी‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’मधील पात्रांची संख्या ध्यानात यावी इतक्या वैपुल्याने या पात्रांचा वावर कादंबरीत आहे. त्यांच्या कादंबरीतील राजकीय सत्ताप्राप्तीच्या रचितात लेखक म्हणून त्यांची विशिष्ट भूमिका आहे. ती आदर्शवादाच्या अंगाने उलगडले आहे. त्यामुळे कथनविषयावर त्यांच्या या मूल्यदृष्टीचा प्रभाव आहे व त्या दृष्टीने त्या साहित्यकृती नियंत्रित केलेल्या दिसतात.
 आधुनिक विचारविश्वातील मानववादी विचारांचा संस्कारठसा त्यांच्या लेखनावर आहे. त्यामुळेच ते स्वत:ला प्रेमचंद परंपरेतील लेखक मानतात. उद्याच्या सुंदर दिवसाचे स्वप्न हा आशावाद त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच एक बोधवादी, आदर्शवादी, नीतिवादी जाणिवेचा प्रभाव त्यांच्या एकूण लेखनावर आहे. देशमुख यांच्या साहित्यात प्रशासकीय जीवनाचे तिथल्या बारकाव्यांसह तपशीलवार चित्रण आले आहे. त्याचबरोबर भारतीय प्रशासनाचा उदय, वाटचाल व भवितव्य यावरील त्यांचे लेखन महत्त्वाचे आहे. राज्यसंस्थाविषयक हे लेखन अकादमिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यास आंतरविद्याशाखीय अभ्यासाची जोड आहे. तसेच ते रोचक ललीत भाषेत पद्धतीने सांगितले आहे.
 गेल्या चार दशकात विविध वाङ्मयप्रकारातून लेखन करणाऱ्या लेखकाच्या लेखनाची कळसूत्रे या विविध समीक्षापर लेखात सांगितली आहेत. समकालीन समाजजीवन आणि वाङ्मयीन परंपरेच्या संदर्भात देशमुख यांच्या साहित्याची चिकित्साही या लेखनात आहे. एक लेखक समजून घ्यायला व त्यांच्या साहित्यवाचनाकडे
१८ अन्वयार्थ