पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बुरखा वापरण्यास निक्षून नकार दिला होता, अन्वरनंही तिला साथ दिली होती! अब्बाजान, सूलतान, रहिम व सईद सारे भडकले. मग अम्मीनंच मध्यस्थी केली, 'देखो - ती ज्या शौरवी देशातून आली आहे, तिथं पडदा पद्धत नाही. एकदम सारं कसं ती स्वीकारील? जरा उसका भी सोचो. हमारे अन्वर के लिए उसने मुल्क छोडा, इस्लाम कबूल किया - धीरे धीरे ये सब वो अपनायेगी....” (पृष्ठ १७३) अशी मिश्र भाषाच तेथील घडामोडी, सर्व पातळीवर चाललेले संघर्ष टिपू शकणार होती. त्यामुळे देशमुख ही भाषा कौशल्यपूर्वक वापरताना दिसतात.

 अफागणिस्तानात सुरू असणाऱ्या भिन्न विचारांच्या संघर्षात जी भाषा देशमुख वापरतात त्यातून तो संघर्ष नेमकेपणाने व्यक्त होताना दिसतो. येथील कर्मठ आणि मवाळ अशा दोन्ही लोकांची भाषा ते अतिशय जबाबदारीने वापरताना दिसतात. येथे अमेरिकेबद्दल द्वेष रुजवणाऱ्या संघटनांची भाषा, येथील बरबादीच्या वाटेवरील तरुण पिढी, त्यांची अगतिकता, भुकेसाठी तळमळणारी जनता, लहान मुलं, त्यांचा सुरू असलेला छळवाद आणि एकूणच तेथे तयार झालेली अनागोंदी - भाषेतून वास्तवदर्शी पद्धतीने देशमुख कादंबरीतून मांडतात. त्यांच्या वरील दोन कादंबऱ्यांपेक्षा या कादंबरीची भाषा नि:संशय प्रगल्भ आणि कादंबरीच्या भाषावापरासंदर्भातील क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेणारी आहे. त्यामुळेच ही कादंबरी त्यांच्या इतर कादंबऱ्यांच्या तुलनेत प्रगल्भ आणि कादंबरीच्या भाषिक अवकाशाची मागणी पूर्ण करणारी यशस्वी कादंबरी आहे.

अन्वयार्थ □ १७९