पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तमीर' सौदी अरेबियातील परिस्थितीवरील कादंबरी आहे. या सर्व कादंबऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर देशमुखांची प्रस्तुत कादंबरी अनेक दृष्टीने वेगळी आहे.

 अफगाणिस्तानच्या वरील परिस्थितीची कहाणी देशमुख यांनी अन्वर, त्याचे कुटुंबीय आणि मित्र यांच्या अनुषंगाने सांगितली आहे. ही पात्रे काल्पनिक असली तरी त्यांची कहाणी खरी आहे. आंतराष्ट्रीय पातळीवरील धार्मिक आणि दहशतवादाचा विषय कादंबरीतून मांडताना येऊन पडणारी जबाबदारी, त्याचे दडपण देशमुख यांनी लीलया पेलले आहे. या कादंबरीचा विषय हे देशमुख यांनी स्वीकारलेलं आव्हान होते. कारण भाषा, प्रदेश, परिस्थिती आणि संस्कृती या सर्वच पातळीवर देशमुखांसमोरील आव्हाने मोठी होती. या आव्हानांचे स्वरूप ही कादंबरी वाचताना लक्षात येते. देशमुखांनी या कादंबरीच्या निवेदनासाठी आणि संवादांसाठी वापरलेली भाषा अफगाणिस्तानच्या सामाजिक आणि राजकीय पर्यावरणाचा नेमका प्रत्यय देणारी आहे. उर्दू, हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांचे एकजीव केलेले मिश्रण बेमालूमपणे कादंबरीत वापरले आहे. जगातील एक सुंदर प्रदेश जागतिक राजकारणाचा बळी ठरून कसा उद्ध्वस्त होत जातो हे लेखकाने नेमकेपणाने चित्रित केले आहे. त्यासंदर्भातील भाषेचे उपयोजन हे वास्तव प्रभावीपणे मांडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या संदर्भातील हा संवाद पाहा, “खरंय अन्वर, मी मिलिटरीतील कामानिमित्त अनेक देश पाहिलेत. रूस, अमेरिका, इराण... पण अपने वतन का जवाब नही. आणि हा काबूल पगमानचा परिसर - माशा अल्ला! उपरवालेने क्या नजारा बक्शा है" (पृष्ठ १३) ही भाषा या परिसराचे एक चित्र उभे करते. हा शांत परिसर पुढे अशांत आणि उद्ध्वस्त होत जातो. त्याचे चित्र पुढील संवादातून मुखर होते. 'गेले तीन दिवस काबूलवर आपल्या तालिबानी फौजा अंगाराप्रमाणे बरसत आहेत. मुल्ला मुहंमद रब्बोनीच्या नेतृत्वाखाली आमचे नौजवां तालिब जान की बाजी लगाके लड रहे है।” (पृष्ठ ८४६) या संवादांमध्ये येणारी भाषा तेथील भाषिक संस्कृतीचे आणि मराठीचे एक अवीट मिश्रण तयार झालेले आहे. हा भाषेचा टोन अफगाणिस्तानची सुमारे पन्नास वर्षांची प्रदीर्घ वाटचाल सांगताना कायम टिकवला आहे. या कादंबरीच्या भाषेमध्ये येणारे दिलो दिमागपर, महजबी संस्कार, सना पठणाचे स्वर, बेहद खूबसूरत, इरादा, बहू, शादी, काफिर, पगमान, बेशक, सच्चाई, शागीर्द, तशरीफ, इज्जत, मदहोश, अफसोस असे शेकडो उर्दू, हिंदी शब्द मराठी भाषेमध्ये चपखलपणे एकजीव झालेले आहेत. या शब्दांच्या वापरातून तयार झालेली वाक्ये अफगाणसंस्कृतीला वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी करण्यात यशस्वी होताना दिसते. 'आजच्या पवित्र शुक्रवारी अब्बाजाननी तान्याला इस्लामची दीक्षा देऊन अन्वरशी निकाह लावून दिला होता. मात्र समारंभात तिनं

१७८ □ अन्वयार्थ