पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



खोत यांच्या 'रौंदाळा'मध्ये आलेली ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या प्रशासकांची आणि गावपातळीवरच्या राजकीय घडामोडींचे नेमके सूचन देणारी भाषा उल्लेखनीय आहे. गाव पातळीवरच्या राजकीय संदर्भानी शंकर पाटलांच्या 'टारफुला' पासून नुकतीच प्रकाशित झालेल्या नामदेव माळी यांच्या 'छावणी', रामचंद्र नलावडे यांची 'कुरण'पर्यंत भाषाभानाचा विचार नोंदवता येईल. परंतु नगरपालिका आणि महसूल खात्याच्या रूपाने या क्षेत्राचे व्यापक संदर्भ असलेली भाषा देशमुखांनी प्रथमच मराठीमध्ये आणली आहे. मोठ्या शहरांपेक्षा खेड्यात आणि नगरपालिका अस्तित्वात असणाऱ्या निमशहरात राजकारण खोलवर झिरपलेले दिसते. ते तेथील जगण्याचा भाग बनलेले असते. हे वास्तव अधोरेखित करणारी भाषा लक्ष्मीकांत देशमुखांच्या 'अंधेरनगरी'मध्ये आलेली दिसते.
 वाचकाला खिळवून ठेवणारी किंवा त्याच्या मनाची पकड घेणारी भाषा आणि व्यवहारबोलीचा वापर देशमुखांच्या वरील दोन्ही कादंबऱ्यांमध्ये दिसत नाही. समाजातील सर्व स्तरातील बोलीरूपांचे सूक्ष्म भान ठेवून ही बोलीरूपे कादंबरीत मांडण्याचे कौशल्य मराठीत फार कमी कादंबरीकारांकडे आहे. यामध्ये भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, राजन गवस, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, विलास सारंग, रमेश इंगळे उत्रादकर, प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत या कादंबरीकारांकडे हे भान दिसते. त्याचबरोबर पुरुषोत्तम बोरकर, किरण नगरकर यांच्या कादंबरीमध्येही हे भाषिक ज्ञान प्रत्ययास येते. लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीची भाषा बोलीरूपापेक्षा प्रमाण मराठीकडे अधिक झुकते. प्रथमपुरुषी निवेदनातून कादंबरीचे कथासूत्र वाचकांसमोर ठेवताना लेखक केवळ मराठीचे प्रमाणरूप वापरताना दिसतो. त्यासाठी निवदनाचे कोणतेही नावीन्यपूर्ण तंत्र, शैली अवलंबत नाही. भाषिक पातळीवर ते कोणत्याही वेगळ्या वाटा चोखळत नाहीत. मराठीतील अनेक कादंबऱ्यांमध्ये दिसणाऱ्या निवेदनाच्या शैली, विनोद आणि उपरोध देशमुखांच्या भाषेत दिसत नाही. तरीही देशमुखांच्या भाषेचे म्हणून काही विशेष नोंदवता येतील.

 लक्ष्मीकांत देशमुख विषयाला थेट भिडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या कादंबरीतील भाषावापरातून करतात. भाषा आणि कथनाच्या पातळीवरचे काही प्रयोग न करता; अनुभवलेले वास्तव प्रांजळपणे समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. वरील दोन्ही कादंबऱ्यांच्या कथनातून आपल्या सभोवतालचे वास्तव ते ज्यापद्धतीने समोर ठेवतात; त्यातून कादंबरीच्या निवेदकाचा म्हणून एक सरळ स्वभाव व्यक्त होतो. परिणामी निवेदनात येणारी भाषा प्रांजळ आणि सरळपणे येते. ती कोणताही आडपडदा किंवा वळणे घेताना दिसत नाही. त्यामुळेच तिचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात औपचारिक भाषावापराचे असते. 'आजच्या बैठकीस जिल्हाध्यक्ष संबोधित

अन्वयार्थ □ १७३