पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा प्रत्येकाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येत राहातो. लक्ष्मीकांत देशमुख तर स्वत:च व्यवस्थेचे घटक. म्हणून या व्यवस्थेला ते आतबाहेरून थेट सामोरे गेलेले आहेत. एखाद्या व्यवस्थेत राहून त्या व्यवस्थेविषयी बोलणं हे बरंच अवघड काम देशमुख यांनी आपल्या लेखनातून केलं आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या मराठीतील महत्त्वाच्या लेखकानेही आपल्या कादंबरीलेखातून हेच . धारिष्ट्य दाखवले आहे. देशमुखांनी हे काम करताना जी संयमी आणि संयत भाषा वापरली आहे तिचे विश्लेषण प्रथम करू. आणि नंतर आपल्या भाषिक प्रदेशाच्या कक्षेपलीकडील, मराठी भाषा आणि माणूस यांचा थेट संबंध नसलेल्या अमराठी भाषिक अवकाशात घडणाऱ्या घटना-प्रसंगावर लिहिलेली 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' चा विचार स्वतंत्रपणे करणे सयुक्तिक ठरेल.
 'अंधेरनगरी' आणि 'ऑक्टोपस' या कादंबऱ्यांची आशयसूत्रे अनुक्रमे नगरपालिकेतील सत्तासंघर्षाचे राजकारण आणि शासनाच्या महसूल खात्यातील भ्रष्ट कारभार अशी आहेत. या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये प्रशासन आणि राजकारणाचे अनेक सूक्ष्म संदर्भ आहेत. 'अंधेरनगरी' या कादंबरीमध्ये एका निमशहरातील नगरपालिकेच्या सत्तासंघर्षात शहरांतर्गत शिजणारे राजकारण, तेथील लोकांच्या वर्तन, बोलण्याचे राजकीय संदर्भ, गट-तट, जात-पात आणि प्रदेशवास्तव, त्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र अस्मिता, राजकारणात प्रशासकीय अधिकाऱ्यांची होणारी कोंडी, व्यवस्थेतील साऱ्यांचेच शहराच्या भवितव्याशी उघडउघड चाललेले खेळ, हितसंबंधांचे राजकारण - असा एका शहराचा वरून दिसणारा चेहरा; आणि याच शहराची दुसरी बाजू असणारे तिचे अधोविश्व अतिशय बारकाईने या कादंबरीमध्ये देशमुख यांनी चित्रित केले आहे. राजकारण आणि प्रशासनव्यवहारासाठी वापरली जाणारी विशिष्ट भाषा या कादंबरीचे आशयसूत्र साकारण्यास मदत करते.

 प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राशी संबंधित भाषिक भांडार तयार झालेले असते. हे संदर्भविशिष्ट भाषिक भांडार त्या त्या क्षेत्राच्या आकलनासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. कोणत्याही क्षेत्रातील व्यवहारभाषेत त्या क्षेत्राचे म्हणून काही भाषिक संदर्भ तयार झालेले असतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रापुरता शब्दनिधीही तयार झालेला दिसतो. या साऱ्या गोष्टींचे भान कादंबरीकाराजवळ असावे लागते. अलीकडच्या बऱ्याच मराठी कादंबऱ्यांमध्ये हे भाषाभान येत आहे. ग्रामीण परिसरातील राजकारण, तेथील गटातटाचे राजकीय संदर्भ, सहकारी संस्थांतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांची या परिसरात तयार झालेली खास भाषा अनेक कादंबऱ्यांतून व्यक्त होते. मराठीतील अलीकडच्या काही कादंबऱ्यातून हे भाषा भान त्या क्षेत्राचे तळस्पर्शी चित्र उभे करण्यात यशस्वी झालेल्या दिसतात. सदानंद देशमुख यांची 'बारोमास', कृष्णात

१७२ □ अन्वयार्थ