पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्यरत असल्याने आपल्या आजूबाजूला चाललेला भ्रष्ट व्यवहार, सबंध व्यवस्थेत खोलवर झिरपलेला भ्रष्टाचार, आजूबाजूची किडलेली माणसं त्यांना अस्वस्थ करतात. आपण ज्या व्यवस्थेचे घटक आहोत, कार्यरत आहोत त्याच व्यवस्थेतील भ्रष्टाचार, बरबटलेपण, तेथील गैरव्यवहार लेखनाचे विषय करणे ही गोष्ट धाडसाची आणि लेखकाची नैतिकता अधोरेखित करणारी आहे. त्यांनी आपल्या संबंध लेखनातून जोपासलेली ही नैतिकता, आपल्या आजूबाजूचे वास्तव भेदकपणे मांडण्याचे दाखवलेले धारिष्ट्य ही बाब त्यांचे लेखक म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'अंधेरनगरी', 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' आणि 'ऑक्टोपस' या तीन कादंबऱ्यांचा येथे विचार करणार आहोत. त्यांनी प्रशासनांतील आजचे दाहक वास्तव मुखर करणारी आशयसूत्रे, 'अंधेरनगरी' आणि 'ऑक्टोपस' या कादंबऱ्यांतून मांडली आहेत. आपल्या देशात आज शिष्टाचारच बनलेला भ्रष्टाचार, व्यवस्थेतील अनैतिक राजकारण, सर्वच पातळ्यांवर झालेली मूल्यात्मक घसरण हा या कादंबऱ्यांचा विषय आहे तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीचे आशयसूत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा व्यापक संदर्भ असून प्रस्तुत कादंबरीतील अवकाश मराठी प्रदेशाबाहेरील आहे. ते या कादंबरीतून अफगाणिस्तानच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीची, तेथील युद्धग्रस्त परिस्थितीची कथा सांगतात.

 साहित्याचे माध्यम भाषा असल्याने एखादा लेखक - कवी आपली निर्मिती करताना भाषेतील सर्जनशील तत्त्वांचा आणि घटकांचा कसा वापर करतो हे अभ्यासणे महत्त्वपूर्ण ठरते. कलाकृतीची संरचना घडवताना आणि साहित्यकृतीला साहित्यमूल्य प्राप्त करून देताना त्या कलाकृतीची भाषा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे लेखकाजवळ असणाऱ्या भाषेची संदर्भबहुलता तपासणे कलाकृतीच्या आकलनाला एक परिमान प्राप्त करून देते. त्या दृष्टीने येथे वरील तिन्ही कादंबऱ्यांची चर्चा करू. विवेचनाच्या सोयीसाठी देशमुखांच्या वरील कादंबऱ्यांचे दोन गट कल्पिता येतील. पहिल्या गटात 'अंधेरनगरी' आणि 'ऑक्टोपस' या कादंबऱ्यांचा विचार करावा लागेल; आणि दुसऱ्या गटात 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीचा विचार करता येईल. हे दोन भिन्न गट कल्पिण्यामागे या कादंबऱ्यासाठी लेखकाने वापरलेल्या भाषेच्या दृष्टीने निश्चित अशी एक भूमिका आहे. लेखक ज्या व्यवस्थेचा, समाजाचा भाग आहे त्या व्यवस्थेचे चित्रण करणाऱ्या दोन कादंबऱ्यांचा पहिला गट आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत अस्तित्वात आलेली प्रशासकीय, राजकीय व्यवस्था ही त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या साऱ्यांच्याच जगण्याचा भाग आहे. कारण ती साऱ्यांसाठी अस्तित्वात आलेली बहुउद्देशीय

अन्वयार्थ □ १७१