पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रशासनावरील त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या या प्रशासकीय लेखनाचा लेखाजोखा चार लेखांमधून मांडला आहे. डॉ. प्रकाश पवार यांनी देशमुख यांच्या या लेखनाची विकासलक्षी प्रशासन आणि खाजगी, सार्वजनिक प्रशासन चौकटीमध्ये चर्चा केली आहे. या लेखनास अनुभवजन्य आधार असून आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे लेखन आहे. असे पवारांनी म्हटले आहे. भारतीय लोकशाहीची वाटचाल, नोकरशाही व्यवस्थेचे अतिशय रोचक पद्धतीचे विवेचन त्यांनी केले आहे. भारतीय प्रशासनाचा विकासलक्षी चेहरा व तीमधील मूल्यात्मक चौकटीत झालेले फेरबदल देशमुख यांच्या लेखनात आहेत. लोकप्रशासनाच्या गरजेसाठी व वाढत्या ज्ञानविस्तारासाठी या प्रकारच्या लेखनाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली आहे. ती महत्त्वाची आहे.
 ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर यांनी देशमुख यांच्या 'प्रशासननामा'मधील लेखनाचे विशेष लेखात नोंदविले आहेत प्रशासनातील अनेकविध गुंते, तीमधील विविध प्रश्नांचा नेमकावेध या लेखनात आढळतो. असे सांगून या लेखनातल्या वाचनीयतेमुळे त्याचे नाते कादंबरी प्रकाराशी जोडले आहे. लीना मेहेंदळे यांनी देशमुख यांच्या या प्रकारच्या लेखनाचे काही मार्मिक विशेष नोंदविले आहेत. 'प्रशासननामा' ही छोट्या छोट्या प्रसंगातून फुलविलेली कथानके आहेत असे त्यांना वाटते. तर 'बखर भारतीय प्रशासनाची' हे पुस्तक भारतीय प्रशासनातील अकादमिक विश्लेषक या स्वरूपाचे आहे.
 या संपादनात अखेरच्या भागात देशमुख यांच्या दोन मुलाखती आहेत. भ. मा. परसावळे, विनोद शिरसाठ व रूपाली शिंदे यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. एक प्रशासकीय अधिकारी व लेखक म्हणून झालेली देशमुखांची त्यांची जडण-घडण व त्यांच्या वाटचालीचे दर्शन या मुलाखतीत आहे. देशमुख यांचा लेखन-स्वभाव, निर्मितीप्रेरणा, वाचसंस्कार व निर्मितिप्रक्रियेचा उलगडा करणारी अनेक रहस्ये या मुलाखतीत आहेत. प्रशासकीय कामातील अनुभव आणि भवताल, वाचनाच्या दिशा त्यामध्ये आहेत. शेवटच्या माणसाच्या संघर्षाची कथा, त्याच्या दुःख, संवेदना लेखक म्हणून त्यांनी जोडून घेतल्या आहे. या अर्थाने त्यांना गांधीवादाचे व प्रेमचंदाचे आकर्षण आहे. त्या धारेला ते स्वत:ला जोडून घेतात. वाचक व लेखक यांच्यातला संवादसेतू अधिकाधिक घट्ट होऊन उद्याच्या सुंदर भविष्यासाठीची उत्कट स्वप्ने पाहावीत असा आशावादी दृष्टिकोन त्यांच्या विचारदृष्टीत आहे. लेखक लक्ष्मीकांत देशमुख जाणून घेण्यासाठी व त्याच्या साहित्याच्या निर्मितिप्रेरणांचे रहस्य आजमावण्यासाठी या मुलाखती महत्त्वाच्या होत.

 एकंदरीतच लक्ष्मीकांत देशमुख यांच्या एकूण लेखनाविषयीच्या कामगिरीचा आलेख या ग्रंथात पाहायला मिळतो. एका लेखकाची जडणघडण, त्याचा संवेदनशील

अन्वयार्थ □ १७