पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीची भाषा

डॉ. नंदकुमार मोरे

कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा उदय एका सामाजिक जाणिवेतून झालेला आहे. त्यामुळे आजअखेर हा वाङ्मय प्रकार प्रामुख्याने समाजवास्तव मुखर करण्यासाठीच हाताळण्यात आलेला दिसतो. कादंबरीकडे चालू काळाचा साहित्य-प्रकार म्हणून पाहिले जाते. कादंबरीची एक साहित्यप्रकार म्हणून अधोरेखित झालेली क्षमता, तिच्याकडून अनेकांगी समाजवास्तवाला कलात्मकतेने भिडण्याची ठेवलेली अपेक्षा यामुळे कादंबरीचे आवाहकत्त्व व्यापक बनलेले आहे. व्यक्तीच्या सूक्ष्म, तरल भावभावनांच्या चित्रणापासून विराट समाजजीवनाचे दीर्घकालीन चित्रण स्वत:त सामावून घेण्याची क्षमता कादंबरीत आहे. त्यामुळे कादंबरीचा रूपबंध खुला आणि सतत बदलता राहिला आहे. तिच्या व्यापक, खुल्या रूपामुळे कादंबरी तेवढ्याच व्यापक आणि विविधांगी भाषिक अवकाशाची मागणी करते. कादंबरीतील आशयद्रव्य जेवढे व्यापक, प्रदीर्घ काळाला कवेत घेणारे आणि विविधांगी समाजजीवनाचे चित्रण करणारे असेल तेवढा विविधांगी भाषावापर ही कादंबरीकारासमोरील मोठी कसोटी असते. चित्रित समाजगटांच्या भाषेची सूक्ष्म जाण ही कादंबरीकाराची महत्त्वाची गरज असते. कादंबरीची कलाकृती म्हणून श्रेष्ठता, तिचे व्यापकत्व कादंबरीकाराच्या भाषिक जाणिवेवर अवलंबून असते. त्यामुळे कादंबरीचा विचार करताना कादंबरीकाराच्या भाषिक क्षमतेचा, त्यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीचा, वापरलेल्या कौशल्यांचा आणि केलेल्या प्रयोगांचा विचार करणे आवश्यक ठरते.

 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीचा या अंगाने विचार करणे हा प्रस्तुत लेखाचा विषय आहे. लक्ष्मीकांत देशमुख मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत. ते पेशाने उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी असून ते एक संवेदनशील ललित लेखक आहेत. त्यामुळेच अधिकारी म्हणून काम करीत असताना अतिशय संवेदनशीलतेने विविध सामाजिक प्रश्नांना ते भिडू शकले. प्रशासकीय सेवेत

१७० □ अन्वयार्थ