पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कट्टर आणि जहाल मस्लीम तरुणांच्या अॅसिडफेकीत सलमा बळी पडते व तिच्या दोन्ही मांड्या भाजून जातात. जळालेल्या मांडीवर रशियातील प्लॅस्टिक सर्जनकडून सर्जरी करून घेण्यात अन्वर सलमाला मदत करतो. अन्वरने केलेल्या मदतीच्या उपकारांच्या उतराईसाठी सलमा त्याबद्दल्यात आपला देह अन्वरला अर्पण करते. अन्वरही कोणतीही खळखळ न करता सहजपणे ती गोष्ट मान्य करतो व त्याची परिणीती सलमाला विवाहपूर्व मातृत्व मिळण्यात होते. अशा काही गोष्टींमुळे अन्वरची व्यक्तिरेखा दुटप्पीपणाची आणि ठिसूळ बनत जाते. प्रखर वास्तवाला कवेत घेणाऱ्या या कादंबरीतील हिंदी सिनेमासारखे काही रोमँटिक प्रसंग मनाला खटकतात.
 असे असले तरी या बारीकसारीक उणीवा वगळूनही देशमुखांनी मुस्लीम जीवनशैलीचा बारकाईने अभ्यास केल्याने जाणवते. मुस्लीम जीवनातील (पुन्हा त्यात अफगाणिस्तानातील) असणाऱ्या अनेक रीतिरिवाज, लोकजीवन, भाषिक, समृद्धी, सण, उत्सव, श्रद्धा - अंधश्रद्धा अशा अनेक बाबींचा पूर्णांशाने अभ्यास निव्वळ माहिती संकलनातून हाती येणे कठीणच आहे. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव गाठीला असणे अधिक महत्त्वाचे ठरते. एका आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आणि दहशतवाद या संवेदनशील विषयावरील कादंबरी लेखनाचा देशमुखांचा हा प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद आहे. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील निरंकुश सत्तास्पर्धा ही जगातील कोणत्याही भूप्रदेशातील, भाषिक समूहातील धर्मसमूहातील असू शकेल. कारण सत्तालालसा ही उपजतच एक आदिम प्रेरणा आहे!

.

संदर्भ


 १) देशमुख लक्ष्मीकांत, इन्किलाब विरुद्ध जिहाद, २०११
 २) देशुमख लक्ष्मीकांत, सलोमी, १९९०
 ३) साने गुरुजी - भारतीय नारी
 ४) देवरे श्रावण - परदेशी रणजित, मंडल आयोग व नवे शैक्षणिक धोरण.

अन्वयार्थ □ १६९