पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



माणसांचं वार्षिक उत्पन्न जेमतेम दीडशे डॉलरच्या आसपास होतं. अशा महागाईच्या परिस्थितीत जगण्याचे वांधे होऊन बसले होते. तेल साबणासाठी आणि कोंबडीच्या खाण्यासाठी हाडांची गरज असते. तेव्हा काही हाडांचे व्यापारी हाडांच्या बदल्यात नानरोट्या देऊ लागले. त्यामुळे हाडांचा हा नवा धंदा तेजीत आला. लहान मुले जनावरांची हाडे शोधून, व्यापाऱ्यांना विकून त्याबदल्यात आपली भूक भागवू लागले. पण जनावरांची हाडं संपली, मिळेनाशी झाली. तेव्हा नाईलाजास्तव कबरी खोदून त्यातून हाडं शोधून व्यापाऱ्यांना विकण्याचा नवा फंडा सुरू झाला. इतकी नैतिक आणि आर्थिक अधोगती या काबूल शहराची झाली. _अफगाणिस्तानची भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, तिथला निसर्ग अफगाणी माणसाचे स्वभावदोष अशा सर्व बाजूंनी विचार करून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी आकारास आली आहे. एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा विषय आणि एका अपरिचित मुस्लीम जगाचा व तेथील माणसांच्या सुखदुःखांचा संघर्ष व जीवनप्रवाह या कादंबरीतून मराठी भाषेत पहिल्यांदाच प्रकट होतो आहे हे लेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांचे महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदान आहे.
 या कादंबरीसाठी देशमुखांनी वृत्तांकन (रिपोर्टिंग) सारखा आकृतीबंध अनेक ठिकाणी वापरला आहे. अपरिचित अनुभवविश्व शब्दांत मांडताना त्याची गरजही असते. पण निव्वळ माहितीचे रकानेच्या रकाने, पृष्ठामागून पृष्ठे भरत चालण्याने काही वेळा कादंबरीतील कथानक गतिमान न होता थांबून राहिल्यासारखे होते. त्यामुळे एकामागून एक बदलत जाणाऱ्या राजवटी, असंख्य पात्रांची गर्दी त्यांचे एकमेकांशी संबंध नसल्यासारखे फटकून राहणे, वर्णनपरता, घटना प्रसंगांची जंत्री अशा काही कारणांमुळे कादंबरीतील अनेक व्यक्तिरेखा मनाची पकड घेत नाहीत. व्यक्तिरेखांमधील ताण किंवा नाट्यमयता बघायला मिळत नाही. कादंबरीतील बहुतांश व्यक्तिरेखा श्रीमंत व्यापारी, जमीनदार, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्रीगण, राजदूत, उच्च हुद्यावरील अधिकारी अशा उच्चवर्गीय आहेत. या व्यक्तिरेखांत सर्वसामान्य वर्गातील व्यक्तिरेखा येताना दिसत नाही. त्यामुळे या सत्तास्पर्धेस सर्वसामान्य अफगाणी माणसाच्या दैनंदिन गरजा आणि जीवनमानात काय बदल होत जातात हे पुरेसे ध्यानात येत नाही. सर्वसामान्य जनतेच्या जीवनाबद्दल लेखकाने निव्वळ वर्णनपर माहितीच समोर ठेवली आहे.

 व्यक्तिरेखांच्या स्वभावचित्रणात लेखकाने फारसे बारकावे शोधलेले नाहीत असे वाटते. आपल्या बालपणीच्या सवंगडी असलेल्या झैनबला सहजासहजी टाळून अन्वर रशियन तान्याबरोबर विवाहाला तयार होतो. यात अन्वरसारख्या उच्चशिक्षित, संवेदनशील आणि धार्मिक वातावरणात वाढलेल्या घरातील व्यक्तीच्या मनात कोणताच अपराधी किंवा मानसिक उलाघालीचा भाव उमटलाच नसेल का?

१६८ □ अन्वयार्थ