पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वंशातील चार मुली माझ्या बायका आहेत. मी खराखुरा अस्सल अफगाणी आहे' असे मस्तवालपणे म्हणतो. तो जमीलासाठी यातल्या कोणत्याही मुलीला सहजपणे तलाक द्यायला तयार असल्याचे सांगतो. तेव्हा जमीलाला त्याची भयंकर घृणा वाटते. ती त्याची निर्भर्त्सना करते. त्यामुळे चिडलेला झाकीर खोटे पुरावे गोळा करून जमीलाला गुन्हेगार म्हणून शाबीत करतो. जमीलाला भर चौकात जमावाकडून दगडाने ठेचून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. जमीला आपल्यावरील आरोप नाकारत मोठ्या धैर्याने शिक्षेला सामोरी जाते. चौकात जमलेल्या गर्दीसमोर मोठ्या आवेशात जमीला शिक्षा भोगण्यापूर्वी जमावाला उद्देशून बयान करते’ - 'जे पटत नाही, चुकीचं व अन्यायाचं वाटतं, त्याविरुद्ध लढणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुम्हाला आजची राजवट अन्यायी व अवामविरोधी वाटत असेल तर प्रतिकाराचा तुम्हाला अधिकार आहे. तो वापरावा. माझ्या या अघोरी शिक्षेनं तुमचे डोळे उघडावेत नि तुम्ही विचार व कृतीला सिद्ध व्हावं, एवढीच माझी अखेरची इल्तिजा आहे' (पृष्ठ ४५७ - ४५८).

 गेल्या दोन - तीन दशकात सत्तास्पर्धेतून सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला आलेल्या पराकोटीच्या दयनीय स्थितीचे चित्रण 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीत प्रभावीपणे मांडले गेले आहे. प्रत्येक गावातील तरुणाला चिथावणी देऊन त्याला 'जिहाद' च्या नावाखाली लढण्याचे सैनिकी प्रशिक्षण देणे, सरकारी कार्यालय, आस्थापनांवर अवचित हल्ला चढवून जमेल तेवढी लूट करणं, पूल उडवून देणे, शाळा उद्ध्वस्त करणे, शिक्षक-शिक्षिकांना धमक्या देणे, मुला - मुलींनी शाळेत जाऊ नये म्हणून धाक दाखवणं अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला अशांतता, हिंसाचार, असुरक्षितताच येते आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ततेची कुणालाच काळजी नाही. गावांच्या गावं उजाड पडत चालली आहेत. सुशिक्षित, नोकर पेशातले व बऱ्यापैकी श्रीमंत लोक अमेरिका, युरोप वा भारताकडे स्थलांतरित होत होते. तर गरीब, मध्यम दर्जाचे आणि मदरसा शिक्षण घेतलेले म्हणजेच कम्युनिस्टांचा द्वेष करणारे पेशावर, क्वेट्टा या पाकिस्तानी क्षेत्रात जात. त्यापैकी काही जण मुजाहिदीन बनत, तर बाकीचे निर्वासितांचं कठीण जिणं जगत. ज्यांना हेही जमायचं नाही ते सतत होणारे हवाई हल्ले, बॉम्बिग आणि गोळीबाराने जीव वाचवण्यासाठी व पोट भरण्यासाठी काबूलसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरित होत. निदान या शहरात जिवाच्या सुरक्षिततेबरोबरच कष्ट करून निदान दोन नानच्या रोट्या मिळण्याची शाश्वती होती. काबूल शहरातील स्थिती मधल्या काळात एवढी भयावह झाली की लोकांना खायला रोटी मिळेना. महागाई प्रचंड वाढली. नानच्या पन्नास किलो आट्याच्या बोरीचा दर पस्तीस अमेरिकन डॉलर पर्यंत वाढला. त्यावेळी सर्वसामान्य अफगाणी

अन्वयार्थ □ १६७