पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पुरुषाला क्षमा नव्हती. त्या अत्याचारी पुरुषाला त्याबद्दल अधोरी शिक्षा दिली जायची. पण कलंकित झालेल्या स्त्रीलाही पठाणी पुरुषासाठी काही स्थान उरत नसे. त्यामुळे बहुसंख्य स्त्रिया बलात्कारित जीवन जगण्यापेक्षा विष घेऊन आत्महत्या करीत. त्याला समाजातील समस्त पुरुष वर्गाची मान्यता असे. जगात प्रथमच क्रांतिकारी इस्लामने स्त्रीला मिळवण्याचा व संपत्तीचा अधिकार दिला. शिक्षणाचा समान अधिकार दिला व ज्ञान मिळवण्यासाठी प्रसंगी चीनला पण जायला हरकत नाही असे वचन दिले (पृष्ठ ४२२). ही इस्लामी शिकवण विसरून 'औरत चार दिवारी में रहे तो अच्छी है..... तिचं स्थान घरात आहे, समाजात नाही' (पृष्ठ ४१२), अशा प्रकारची पुरुषप्रधान मानसिकता पुढे येते. स्त्रियांवर घातलेल्या निबंधाविषयीचे एक पत्रक तालिबानी पोलीस आंतरराष्ट्रीय संघटना व दूतावासांना पाठवितात. त्या पत्रकातील अनेक सूचना खूपच बोलक्या आहेत. 'इस्लामी अफगाणिस्ताननं धर्माला अनुसरून स्त्रियांवर काम न करण्याचे निर्बंध घातले आहेत. अपवाद म्हणून फक्त काही क्षेत्रात त्यांना कामाची परवानगी दिली जाते, याची सर्व आंतरराष्ट्रीय संस्था व दुतावासांनी गंभीरपणे नोंद घेऊन त्याचं पालन करावं. इस्लामी कानूनप्रमाणे अत्यावश्यक कामाखेरीज मुस्लीम स्त्रियांनी घराबाहेर पडायचं नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्राखरीज इतरत्र काम करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय संघटनांनी अफगाण किंवा इतर स्त्रियांना कामावर ठेवण्यापूर्वी आमच्या विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अफगाणी स्त्रीनं परदेशी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यात वरिष्ठ पद घेता कामा नये. अॅम्बप्युलन्स वा इतर वाहनातून जाताना तिनं ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसू नये. तसेच ज्या वाहनातून परदेशी माणसं जातात, त्यातही बसून तिनं प्रवास करू नये. अफगाण स्त्रियांवर असेही निर्बंध घालण्यात आले आहेत की, त्यांनी त्यांच्या आजारी व रुग्ण पुरुष नातेवाईकांना दवाखान्यात जनरल वॉर्डमध्ये जिथं अपरिचित व गैरमर्द शरीक झाले आहेत, भेटीस जाऊ नये. तसेच आधुनिक, आकर्षक कपडे घालून त्यांनी दवाखान्यात जाऊ नये. स्त्रियांनी ह्या आज्ञा पाळीत भारदस्तपणे वागलं पाहिजे. पायांतील बुटांचा आवाज होणार नाही, असं हळुवारपणं चाललं पाहिजे.' (पृष्ठ ४४३) या पत्रकातील निर्बंधावरून अफगाणी स्त्रीच्या वाट्याला काय स्थिती अनुभवास आली आहे याचा पडताळा येईल.

 अन्वरची पुतणी आणि कवयित्री जमीला हिच्या वाट्याला पराकोटीचा अन्याय येतो. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा झाकीर जमीलासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतो. खरे तर ह्या झाकीरने पूर्वीच चार जणींशी निकाह केलेला आहे. 'स्त्री म्हणजे उपभोगाचे साधन' अशी समजूत करून घेतलेला झाकीर पुरुषी अहंकाराने जमीलाला, 'या देशात जे प्रमुख चार वंश आहेत पठाण, हाजरा, ताजिक व उज्बेकी त्या

१६६ □ अन्वयार्थ