पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ही त्याच्यावर मनापासून प्रेम करते. तिने त्याला आपला भावी पती समजून टाकलं आहे. पण पुढे अन्वर मॉस्कोला गेल्यावर तान्या ऊर्फ तरानाच्या प्रेमात पड़न विवाहबद्ध होतो. तान्या ही खरे तर रशियन गुप्तचर संघटनेतील आहे. याचा उलगडा कित्येक वर्षानंतर अन्वरला होतो व तो तिच्याशी संबंध तोडतो. हे सहन न होऊन तराना आत्महत्या करते. अन्वर पुन्हा झैनबकडे वळून तो तिच्याशी निकाह लावतो. अन्वरची पुतणी जमीला ही अफगाणिस्तानातील एक प्रतिनिधिक स्त्री व्यक्तिरेखा म्हणून चित्रित झाली आहे. जमीला ही अत्यंत तरल काव्यवृत्तीची संवेदनशील कवयित्री आहे. अफगाणिस्तानात समतेसाठी, लोकशाहीसाठी आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या जमीलाच्या आयुष्याची परिणिती तिला दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेत होते व कादंबरी आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करून संपते.

 कैरोच्या अल - अझर या जगप्रसिद्ध इस्लामिक विद्या केंद्रातून धर्मशिक्षणाची सर्वोच्च पदवी प्रावीण्यसह संपादन केलेले धर्माचार्य म्हणजे प्रो. करीमल्ला. त्यांनी आपल्या धर्मविषयक व्याख्यानांनी व कुराण, हदीस, शरीयतच्या भाष्यांनी अनेक प्रतिष्ठित अभिजन व धार्मिक नेत्यांना आकर्षित केलं होतं. आपल्या देशातील वाढती आधुनिकता, युरोपियन पेहराव-चालीरितींना येत असलेली प्रतिष्ठा, सोव्हियत युनियनची वाढती मैत्री व डावीकडे झुकणाऱ्या विचारांना बुद्धिजीवी वर्गात मिळत जाणारी प्रतिष्ठा - या साऱ्या बाबी करीमुल्लांसाठी चिंतेच्या आहेत. ते सतत या गोष्टींना आपल्या भाषणांतून विरोध करतात. 'माझ्या अफगाणिस्तानची प्रगती मला पण हवीय - पण ती इस्लाम सोडून नव्हे! इस्लाम हा केवळ व्यक्तींनी पाळायचा धर्म नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे, सर्वश्रेष्ठ व कोणत्याही बदलांची आवश्यकता नसलेली. तिच्याविना होणारी प्रगती ही केवळ भौतिक भोगवादी असेल! त्यात आपण आपला इस्लामी आत्मा गमावून बसू!' (पृष्ठ ४२) ही प्रो. करीमुल्लांची पुनरुज्जीवनवादी विचारसरणी आहे. त्यांनी स्त्रियांच्या बुरखा पद्धतीचा कडाडून आग्रह धरला. मात्र आधुनिक विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून करीमुल्लांच्या या आग्रही भूमिकेला प्रचंड विरोध होतो. 'प्रेषितांनी त्यांच्या काळात जो क्रांतदर्शीपणा व पुरोगामीपणा दाखवला, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान दर्जा दिला. त्याच्यापुढे आपण आजच्या काळात जायला हवं, किमानपक्षी तेवढं तरी कायम ठेवायला हवं!' अशी भूमिका घेतली जाते. करीमुल्ला. आणि अन्वर यांच्या भूमिकेत खूप मोठे मतभेद आहे. अन्वर कम्युनिस्ट विचारांचा पुरस्कर्ता आहे. मात्र प्रो. करीमुल्ला कम्युनिस्ट राजवटीवर जोरदार टीका करतात. कम्युनिस्ट राजवटीत माणूस व त्याच्या आध्यात्मिक जाणिवांना काही स्थान नाही. त्यापेक्षा इस्लाम हाच परिपूर्ण

अन्वयार्थ □ १६३