Jump to content

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधुनिकतेची दोन रूपे आणि दुसऱ्या बाजूला मध्ययुगीन आचारविचारांचा आग्रह धरणारी इस्लामी संस्कृती यांच्या त्रिकोणमितीचे इन्किलाबमध्ये ललित अंगाने चित्रण केले आहे. यातला एक संघर्ष अमेरिका नियंत्रित पाश्चात्त्य संस्कृती आणि रशियन नियंत्रित संस्कृती यांच्यामधील, दुसरा साम्यवादी आणि स्थानिक संस्कृती व तिसरा पाश्चात्त्य व इस्लामी संस्कृती यांच्यातला आहे. या प्रश्नाची गुंतागुंत कादंबरीत तटस्थतेने हाताळली आहे. या संस्कृतीसंघर्षाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन खुला आहे. कादंबरीतील स्त्री-चित्रणबद्दलचा प्रागतिक दृष्टिकोन व विचारसरणींकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी हे या कादंबरीचे यश आहे असे त्यांनी नोंदविले आहे. कादंबरीतील कथनसृष्टीकडे पाहण्याची व आकलनाची वेगळी दृष्टी या विवेचनात आहे.
 प्रल्हाद वडेर, अरुण साधू व अनंत मनोहर यांच्या लेखात आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोकांतिका, कादंबरीचे बहुमितीपण व प्रसरणशीलता, आशयविस्ताराचा विस्तृत फलक - या कादंबरीच्या वैशिष्ट्यांचा निर्देश केला आहे. ही कादंबरी मराठीत नवी गुणात्मक भर घालणारी व नवा पायंडा पाडणारी कादंबरी असल्याचे अरूण साधू यांनी म्हटले आहे.
 विश्राम गुप्ते यांनी अर्धशतकाची कहाणी रोचक डॉक्युमेंटरीच्या अंगाने मांडल्याचे म्हटले आहे. या भव्य आकारात पन्नास वर्षाचा रक्तरंजित इतिहास ललित अंगाने उलगडून दाखविला आहे. राजकीय सत्तेची मानवतावादाच्या अनुषंगाने कठोर समीक्षा या कादंबरीत आहे. अनेकविध पात्रांच्या कादंबरीतील उपस्थितीमुळे भावनांचा समृद्धीविस्तार झाल्याचे गुप्ते यांनी म्हटले आहे. अभ्यास आणि प्रतिभाविलास यांचा मिलाफ हा या कादंबरीचा गुण असल्याचे त्यांनी नोंदविला आहे. डॉ. वि. द. वासमकर यांनी या कादंबरीतील धार्मिक आणि राजकीय चर्चाविश्वाचे विशेष नोंदविले आहेत. दत्ता घोलप यांनी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीतील कथनव्यवस्थेचे विशेष नोंदविले आहेत. कथनातील अनेक केंद्रित्व, संवादचर्चा, कथाबाह्य, कथांतर्गत निवेदन - हे समूहचित्रणासाठी उपयुक्त ठरल्याचे म्हटले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'दूरदर्शन हाजीर हो' व 'अखेरची रात्र' या नाट्यलेखन कामगिरीचा वेध सागर अध्यापक यांनी त्यांच्या लेखात घेतला आहे. मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची शोकात्मिका 'अखेरची रात्र' आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे.

**


 प्रशासनविषयक लेखन हा देशमुख यांच्या लेखनाचा एक वेगळा पैलू. प्रदीर्घ काळ शासकीय व्यवस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून देशमुख यांनी कार्य केले आहे. या क्षेत्रात दीर्घकाळ ते असल्यामुळे एक प्रकारच्या आंतरिक गरजेपोटी त्यांच्याकडून हे लेखन झाले असावे. 'प्रशासननामा' व 'बखर भारतीय प्रशासनाची' ही भारतीय

१६ □ अन्वयार्थ