पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सलोमीचा जीव गुंतत चालला होता. विजयच्या मृत्यूमुळे सलोमी मानसिकदृष्ट्या कोसळून पडते. आपल्या पाठीवरच्या बहिणींचे विवाह खोळंबले आहेत, याची जाणीव झाल्याने ती नाईलाजास्तव गल्फकंट्रीतील सुलेमान शेखशी विवाहबद्ध व्हायला तयार होते. खरे तर सुलेमान तिला पत्नीऐवजी रखेली म्हणूनच किंमत देणार याची तिला कल्पना आहे. पण तरीही ती या तडजोडीला तयार होते व स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या एका भयावह सत्याची जाणीव वाचकांना होऊन जाते. सलोमीचे यापुढील आयुष्य करुणाजनक असल्याचे वास्तव मनाला हुरहुर लावून जाते.
 लक्ष्मीकांत देशमुखांनी 'सलोमी' या कादंबरीतून मुस्लीम समाजजीवनातील विविध प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात प्रामुख्याने तलाक, धार्मिक रीतिरिवाज, स्त्री स्वातंत्र्य अशा काही घटकांविषयी मांडणी त्यांनी केली आहे. मुस्लीम कथाआशयाला आवश्यक अशा सांकेतिक खुणांचा खुबीदारपणे वापर देशमुख करतात. त्यामुळे मुस्लीम समाजजीवनाची पाश्वभूमी सहजपणे उभी राहते. मात्र दुसऱ्या बाजूला सलोमीची व्यक्तिरेखा प्रभावी किंवा ठसठशीतपणे समोर येत नाही. पुरुषप्रधान धर्मसंस्कृतीला छेद देण्याची पात्रता तिच्या मानसिकेत दिसत नाही. त्यामुळे मूकपणे ती या संस्कृतीला शरण जाते. अन्वरच्या छान-छोकी आणि नाटकी स्वभावाचा थोडाफार अंदाज येऊनही त्याच्याबरोबर डाक बंगल्यावर एकटीने जाणे; विवाहानंतर तो कोठेवाल्याबाईचे उंबरठे झिजवतो आहे हे समजल्यावर त्याच्याशी संबंध ठेवायला तयार होणे, त्याच्या सॅडिस्ट शृंगार-क्रीडा हव्याहव्याशा वाटू लागणे, आपल्यामुळे आपली छोटी बहीण आयेशा हिचे लग्न मोडू नये म्हणून पुनर्विवाहास तयार होणे, अरब शेखाची रखेली होण्यास तयारी दर्शविणे अशा अनेक ठिकाणी सलोमी आपल्या मनाचा कणखरपणा दाखविण्यात अपयशी ठरते. त्यामुळे सलोमीवर आलेल्या दुर्दैवी परवडीला सलोमीच अधिक जबाबदार ठरते. ती भाबडी नायिका वाटू लागते. सलोमीच्या तुलनेत अधिक बंडखोरपणा दाखविणाऱ्या नायिका देशमुखांच्या 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये प्रकट झाल्या आहेत.

 निघृण सत्तास्पर्धा आणि निरंकुश नेतृत्व यांत गरफटलेले अफगाणिस्तानातील सत्ताकारण हे मुख्य आशयसूत्र 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये पाहावयास मिळते. १९७८ साली तत्कालीन अखंड सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचाधारेतून प्रेरणा घेऊन डाव्या विचारांची राजवट अफगाणिस्तानात सत्तास्थानी आहे. मात्र १२ वर्षे टिकलेली ही राजवट गैरइस्लामी आहे म्हणून ती त्याज्य आहे असे मानून तेथील मुल्ला मौलवींनी प्रतिकार सुरू केला. यातून १९७८ ते २०१३ या पाव शतकात अफगाणिस्तानाचा एकही दिवस असा गेला नाही, ज्या दिवशी गोळीबार,

अन्वयार्थ □ १५९