पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आळख मुस्लीम स्त्रियांच्या टक्केवरीच्या तलनेत अत्यंत अल्प अशी आहे. या अर्थाने निम्म्याहून अधिक मुस्लीम स्त्रीच्या जीवनात निर्माण होणारे प्रश्न मराठी साहित्यात प्रकट झाले आहेत काय? मुस्लिमांचे लोकसंख्येत १०.५ टक्के एवढे प्रमाण असूनही राजकारणात मात्र ३ टक्के, शिक्षणात १.५ टक्के, नोकरीत १ टक्का तर व्यापारात २ टक्के असे अत्पल्प आहे. अशीच आकडेवारी आपण मुस्लीम स्त्रियांच्या बाबतीत तपासून पाहिली तर धक्कादायक निष्कर्ष हाती येतील. खेड्यापाड्यातील मुस्लीम स्त्री ही श्रमजीवी आहे. पण कष्टकरी असूनही तिला नेहमीच असुरक्षितपणाच्या रेट्याखाली राहावे लागते आहे हे वास्तव चित्र मराठी साहित्यात कितपत प्रकट झाले आहे? शेतामध्ये राबणारी, मोलमजुरी करणारी, दारोदार भटकून खेळणी विकणारी, अत्तारीचा व्यवसाय करणारी, हलके फुलके उद्योग करून अत्यंत सामान्य जीवन जगणारी, हलाखीत संसारगाडा पुढे रेटणारी मुस्लीम स्त्री मराठी साहित्यात आलीच नाही. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत देशमुखांनी आपल्या कादंबरीतून अत्यंत जिव्हाळ्याने मुस्लीम स्त्री जीवन रेखाटण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

 "सलोमी' ही अवघ्या साठेक पृष्ठांची छोटेखानी कादंबरी. एका कर्मठ वातावरणात वाढलेल्या सलोमी या स्वतंत्र विचाराच्या आणि संवेदनशील तरुणीची ही कथा आहे. मुस्लीम स्त्रियांनी चित्रपट पाहू नयेत, त्यामुळे त्यांच्यावर अनैतिक संस्कार घडतील अशी हेतूने काढलेल्या मुल्ला-मौलवींच्या फतव्याला सलोमी विरोध करते. काही मुलींना घेऊन ती थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघून आपल्या परीने प्रत्यत्तर देते. मात्र तिला या कृतीचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात. सिनेमाबंदी विरुद्धच्या तिच्या आंदोलनामुळे घरची मंडळी नाराज होतात. सलोमीचे तिच्या इच्छेविरुद्ध एका चंगीभंगी, मंदिरा आणि मदिराक्षीच्या जगात मशगुल असलेल्या छान छोकी रईसजाद्याशी लग्न लावून दिले जाते. अन्वर नावाच्या रईसजाद्याने कपटनीतीने लग्नापूर्वीच सलोमीला आपल्या वासनेची शिकार बनविले होते. लग्नानंतरही तो सलोमीवर पाशवी अत्याचार करीत राहतो. सलोमी गर्भवती राहते पण दुर्दैवाने तिचे बाळ मृत जन्माला येते. अन्वरचा छंदी फंदी शौक चालूच राहतो. त्याचा सलोमीतील रस संपत जातो आणि दुसऱ्या एका नव्या स्त्रीच्या शोधात राहतो. यामध्ये सलोमीची अडचण वाटू लागल्याने तो सहजपणे तिला तलाक देऊन तिचा त्याग करतो. सलोमी माहेरी येते. पण आधीच नाराज असणारे तिचे माहेरचे लोक पुन्हा जास्तच तिचा तिरस्कार करू लागतात. सलोमी तलाकपीडित स्त्रियांची एक संघटना स्थापन करते. या सगळ्या घडामोडीत सलोमीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या विजयची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या होते. खरे तर विजयमध्ये

१५८ □ अन्वयार्थ