पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बरोबरीने काबाडकष्ट करून द्रव्यार्जन करते. या स्त्रीवर्गाचे जगण्याचे इतर खूपच प्रश्न असूनही या प्रश्नांना बगल दिली जाते. स्त्रियांच्या समस्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि संमिश्र असते. सामाजिक परिस्थितीच्या संदर्भत या स्त्री-समस्यांचा खोलवर विचार केला गेल्याशिवाय व त्या समस्यांची गुंतागुंत लक्षात घेतल्याशिवाय वास्तव चित्रण कठीण होते. इस्लाममधील स्त्रियांचे स्थान अधोरेखित करताना साने गुरुजी म्हणतात- 'मुसलमानी धर्म काही स्त्रियांना पडद्यात बसा नाही सांगत. काबाला प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी तोंडावर जरा पदर ओढून घ्यावा, एवढेच पैगंबराचे सांगणे. महंमदांच्या काही पत्ल्या प्रवचने करीत. स्त्रीला वारसा हक्क देणारे पैगंबर स्त्रीला कमी मानीत नसत. 'पुरुष काय, स्त्री काय एकाच मातीतून आलात' असे ते म्हणत. अरबस्तानात लहान मुलींना वाळूत जिवंत पुरून मारीत. आई-बापांना मुलींना सांभाळणे कठीण जाई. कशाला मुलगी जन्मली, असे म्हणत. परंतु पैगंबरांनी या गोष्टीला आळा घातला. कुराणात पुन:पुन्हा मुलींना नीट वागवा असे उल्लेख आहेत. परंतु इस्लाममध्ये पडदा आला खरा. केमालपाशाने तुर्कस्थानातून तो दवडला. परंतु इतर मुस्लीम राष्ट्रांतून तो अजून आहे. हिंदुस्थानातही आहे. मुस्लीम संस्कृतीने हिंदू संस्कृतीसही हा बुरखा बहाल केला. पडदा म्हणजे प्रतिष्ठितपणाचे लक्षण! गरीबांना पडदा घेऊन कसे चालेल? त्यांना तर कामाला जायला हवे. गरीबात मोकळेपणा राहिला. ही दळभद्री चाल श्रीमंतात, नबाबात, राजेराजवाड्यात राहिली.' अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत इतर सामाजात विधवा विवाहास मान्यता नव्हती. पण इस्लामने विधवा विवाहाला चौदाशे वर्षांपूर्वीच मान्यता दिली आहे. स्वत: मुहम्मद पैगंबरांनी विधवेशी लग्न करून जगापुढे खूप मोठा आदर्श ठेवला आहे. इस्लामने लग्नाच्या संदर्भात स्त्रीच्या मताला महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. तलाक घेण्यासंदर्भातही तिला अधिक अधिकार दिलेले आहेत. पण इस्लामला अभिप्रेत असलेले स्त्रीस्वातंत्र्य वास्तव जीवनात मुस्लीम स्त्रीला का उपभोगता येत नाही? याचे मुख्यत्वे कारण पुरुषप्रधान संस्कृतीचे खोलवर रुजलेले संस्कार हेच होय.
 'अक्षरओळख म्हणजे साक्षरता' अशी जर आपण साक्षर असण्याची व्याख्या केली तर बहुसंख्य मुस्लीम स्त्रिया साक्षर ठरू शकतील. मुस्लिमांची धर्मभाषा अरबी आहे. स्त्रियांना कुराणपठण करता आले पाहिजे ही अपेक्षा सर्वसाधारण मुसलमान माणूस बाळगतोच. बहुतांशी स्त्रियांना नमाज पढण्यापुरती, कुराण वाचण्यापुरती अरबी भाषेच्या अक्षरांची ओळख आहे. मात्र अर्थाशिवायची ही अक्षरओळख बहुतेक जणींना व्यावहारिक गोष्टींत उपयोगी पडत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, महाराष्ट्रातील मुस्लीम व्यवहारासाठी मराठी भाषा वापरतो. मराठी भाषेची
अन्वयार्थ □ १५७

न्वयार्थ □ १५७