पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्रपणे विचार करणे सोईचे ठरेल. मराठी साहित्यात मुस्लीम स्त्रीजीवन अगदी अल्प प्रमाणात प्रकट झाले आहे. मुस्लीम स्त्रीजीवनाचे मराठीत म्हणावे तितके दखल घेण्याजोगे लेखन झालेले नाही. मुस्लीम आणि मुस्लिमेतर लेखकांनी याबाबतीत मुस्लीम स्त्रीच्या खऱ्याखुऱ्या वास्तव जगाकडे पाठ फिरविली आहे. याबाबतीत जे काही स्त्रीजीवन चित्रणाचे मोजके प्रयत्न झालेले आहेत त्यामध्ये लक्ष्मीकांत देशमुखांच्या 'सलोमी' ची नोंद घ्यावी लागते.
 मुस्लीम स्त्रीच्या बाबतीत मराठी साहित्यात खूपच उपेक्षा वाट्याला आली आहे. काही अपवाद वगळले तर मुस्लीम स्त्रीकडे 'माणूस' म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण झाला नाही असे म्हणता येईल. एकूणच मराठी लेखकाच्या मुस्लीम धर्माविषयीच्या कल्पना आणि त्याचे मुस्लीम मानसिकता समजून घेण्यातील अनुभवविश्व खूपच तोकडे पडते आहेत. त्यामुळे मुस्लीम स्त्री साहित्यात येणेच दुरापास्त होऊन गेले आहे. मुस्लीम स्त्रीकडे आस्थेने पहावा असा व्यापक परीघ निर्माण करणे मराठी लेखकांना जमलेले नाही.

 मुस्लीम स्त्रीच्या कार्याची, कर्तृत्वाची दखल सामाजिक-राजकीय स्तरावर फारशी घेतली गेली नाही. साहित्यातही तिच्या अस्तित्वाची दखल पुरुषावर प्रेम करणारी एक उत्तम माता, पत्नी, पतिव्रता, बहीण किंवा दुसऱ्या टोकाला उत्तम मोहमयी गणिका आणि वाईट जीवनमूल्य असलेली बाजारी स्त्री अशा पद्धतीने घेतली गेली आहे. आपल्या एकूण व्यवस्थेत स्त्री दुय्यमच मानली गेली. मुस्लीम स्त्रीला तर अधिकच उपेक्षा सहन करावी लागून ती दुय्यमच नव्हे तर 'तिय्यम' स्थानावर राहिली आहे. हा तिय्यमपणा कायम टिकून राहावा म्हणून तिची जीवनपद्धती विशिष्ट चौकटीत आखून दिलेली आहे. रूढ आणि चाकोरीबद्ध जीवनामध्येच ती गुरफटून राहावी अशा व्यवस्था करण्यात आली. अशा जगण्यातच तिची इतिकर्तव्यता आहे असे सातत्याने तिच्या मनावर बिंबवले गेले आहे. तिचे सामर्थ्य क्षीण करून ती गुलामगिरीत कशी राहील याचे पद्धतशीरपणे नियोजन करण्यात आले. इस्लामने 'स्त्री' च्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहे. मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सरंजामी व्यवस्था आणि तिच्या अंकित धर्मगुरूंनी मुस्लीम स्त्रीला एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले. मुस्लीम स्त्रीवरील या अन्यायाला इस्लाम जबाबदार नसून कर्मठ, सनातनी, सरंजामी व्यवस्था अधिक जबाबदार आहे.
 'तलाक व बुरखा एवढेच प्रश्न म्हणजे मुस्लीम स्त्रीचे प्रश्न' अशा मनोवृत्तीतून मुस्लीम स्त्रीच्या दुःखाचे चित्रण सातत्याने पुढे आणले जाते. अधिकांश मुस्लीम समाज ग्रामीण भागात राहणारा असा आहे. ग्रामीण भागातील मुस्लीम स्त्री पुरुषांच्या

अन्वयार्थ □ १५५