पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीतील
मुस्लीम जीवन चित्रण

रफीक सुरज

 लक्ष्मीकांत देशमुख यांचा १९८० नंतरच्या कालखंडातील एक हरहुन्नरी आणि समर्थ लेखक म्हणून उल्लेख करता येईल. कादंबरी आणि कथा या दोन्ही प्रकारांत त्यांची बंडखोर वृत्ती दिसून आली आहे. देशमुखांची एकूण जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बरीचशी भावुक, आत्मीयतेची आणि वास्तवतेकडे झुकणारी अशी आहे. त्यांनी आपल्या लेखनातून समकालीन वास्तवाचा धीटपणे वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या आतापर्यंत 'सलोमी', 'अंधेरनगरी', 'होते कुरूप वेडे', 'ऑक्टोपस' आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' अशा एकूण पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. या पाच कादंबऱ्यांपैकी 'सलोमी' आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या दोन कादंबऱ्यांतून मुस्लीम जीवनचित्रण प्रकर्षाने प्रकट झाले आहे. प्रस्तुत निबंधात या दोन कादंबऱ्यांच्या आधारे देशमुखांच्या कादंबरीतील मुस्लीम जीवन चित्रणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 देशमखांची 'सलोमी' ही कादंबरी १९९० साली तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी २००४ साली प्रकाशित झाली. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या बृहद्कादंबरीची पहिली आवृत्ती सुरुवातीस जवळजवळ साडेनऊशे पृष्ठांची इतक्या मोठ्या आकाराची होती. मात्र आता या कादंबरीची दुसरी आवृत्ती आवश्यक त्या बदलांसह पुष्कळच छोटी होत (सुमारे ४६० पृष्ठांची) वाचकांसमोर येते आहे. प्रस्तुत विवेचनासाठी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ची नव्याने येत असलेली दुसरी आवृत्ती आधारभूत मानली आहे.
_

 'सलोमी' ही एका बंडखोर महाराष्ट्रीयन मुस्लीम स्त्रीच्या वाताहतीची कहाणी आहे. तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये जीवघेण्या संघर्षात सर्वस्व गमावून बसलेल्या अफगाणिस्तान या देशाची आकांतकथा आहे. या दोन्ही कादंबऱ्यांतील भौगोलिक प्रदेश आणि संस्कृती एकदम भिन्न अशी आहे. म्हणूनच दोन्ही कादंबऱ्यांचा

अन्वयार्थ □ १५५