पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तरी तिचे सर्वच व्यवहार 'अंधेरनगरी'च्या परिघात येत नाहीत. मुद्दा लोकांनी आपल्या अधिकार रक्षणार्थ जास्त जागृत होण्याचा आहे.
 या कादंबरीत केवळ तीन वर्षांतील नगरपालिकेतील राजकारणाचा वेध घेतला असून लेखक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यातील बारकावे त्यात चांगल्याप्रकारे आले आहेत. उजेड कधी पडणार त्यावरच अंधेरनगरीतील अंधार दूर होणे अवलंबून आहे. कादंबरीत राजकारणाची निगेटिव्ह बाजू प्रत्ययकारकरीत्या आली आहे. कादंबरीच्या निवेदनाचा प्रवाह चांगला असून वाचक कोठेही कंटाळत नाही हे लेखकाच्या कथनशैलीचे यश आहे. मुख्य पात्रे ठाशीव स्वरूपात चित्रित झाले असून त्या चित्रणात कोणतीही अतिशयोक्ती नाही. मराठीतील प्रख्यात कादंबरीकार भाऊ पाध्ये यांनी अशा प्रकारच्या सत्ताकारणास डोंबाऱ्याचा खेळ म्हटले होते. नगरपालिकेतील राजकारणाचा ‘डोंबाऱ्याचा खेळ' या कादंबरीत देशमुखांनी यशस्वीरित्या दाखवला आहे.

१५४ □ अन्वयार्थ