पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोडकांची रवानगी पोलिस कोठडीत होते. कारण नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांना कायद्याचे भान नाही, औचित्य-अनौचित्य कळत नाही. भांगेच्या आधीच्या व निवृत्तीस आलेल्या मुख्याधिकाऱ्यांना कणा नाही. राजकीय नेत्यांशी संघर्ष करण्याची तयारी नाही. मालखरेसारखे आक्रमक पत्रकार हितसंबंधांचा प्रश्न येताच स्तब्ध होतात व मुख्य म्हणजे या सर्व प्रकरणात ज्यांच्या हिताचा बळी जात आहे, ज्यांच्या नागरी सुविधांवर आच येत आहे तो सामाजिक समाज गप्प आहे. आबागुरूजी व मोडक एकाकी पडतात आणि पोतदारांसारखे समाजसेवक सरकारी मदतीपासून आपली कुष्टधाम संस्था वंचित होऊ नये म्हणून कोणत्याच प्रकारच्या संघर्षाच्या राजकारणात उतरत नाहीत. ते जपून वागतात.
 कादंबरीकारास ही परिस्थिती असह्य आणि निराशजनक वाटते. कादंबरीकार तरुण असताना सुमारे वीस वर्षांपूर्वी लिहिलेली की कादंबरी आहे आणि अनेक कर्तबागार नि:स्पृह अधिकाऱ्यांना नगरपालिका प्रशासनात जे अनुभव आले त्याचे हे चित्रण आहे. त्याला एक प्रकारचे वैफल्य आहे. राज्यकर्ता वर्ग, लोक प्रतिनिधी भ्रष्ट अधिकारी व पालिकेच्या मलिद्यावर जगणारे समाजातील काही हितसंबंधी गट यांच्या सामूहिक स्वार्थावर चालणारे नगरपालिकेचे राजकारण हे जाणत्या व संवेदनशील माणसाला विषण्ण करणारे आहे. म्हणून त्यास देशमुखांनी 'अंधेरनगरी' हे नाव दिले आहे. उत्तरपेशवाईतील एक मोठा कवि शाहीर परशुराम याने 'अंधेरनगरी' या लावणीत वर्णन केल्याप्रमाणे काही प्रमाणात चित्र आहे ही गोष्ट खरी आहे. पण मुख्य प्रश्न त्यात सुधारणा कशी करायची हा आहे.

 ही स्थानिक प्रशासनाची लोकशाही पद्धत आपण गेल्या सव्वाशे वर्षापासून राबवत आहोत. यात सगळ्याच गोष्टी वाईट आहेत, पालिकेचे सर्वच व्यवहार भ्रष्ट आहेत किंवा सर्वच लोक प्रतिनिधी भ्रष्ट आहेत असा प्रकार नसला तरी यात स्पर्धेचे जे राजकारण आहे ते संपूर्ण प्रक्रियेस भ्रष्ट बनवते आणि समाजात कार्यरत असणारे दबावगट व हितसंबंधी गट सातत्याने आपल्या गटस्वार्थासाठी प्रयत्न करीत असतात. निर्णय घेणाऱ्या यंत्रणेवर दबाव टाकत असतात. अमेरिकेत सर्वच सभागृहात या प्रकारचे 'लॉबिंग' चालते. अशा प्रकारचे दबावगटाचे व हितसंबंधी गटांचे राजकारण व सर्वसामान्यांचे हित जपणारे राजकारण यांच्यात जो सततचा संघर्ष आहे तो कसा सोडवायचा व नागरी समाजात निर्माण झालेल्या संघटना व संस्था यात काय भूमिका बजावू शकतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे. देशमुखांनी ज्या काळात ही कादंबरी लिहिली, त्या काळात अजून अशा संघटना व संस्था निर्माण झाल्या नव्हत्या. नगरपालिकांच्या व्यवहारात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असला

अन्वयार्थ □ १५३