पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संपत्तीचा अपहार करून आपला वैयक्तिक लाभ कसा करून घ्यावयाचा ही आहे व समाजातील सर्वच घटक या लूटमारीत सामील आहेत. भांगे या अधिकाऱ्याचा एकहाती संघर्ष देशमुखांनी यात रंगवला आहे.
 कादंबरीत तिसऱ्या पातळीवरील संघर्ष हा कर्तव्यदक्ष व शुद्ध चारित्र्याचा मुख्याधिकारी भांगे आणि स्वत:स शुद्ध चारित्र्याचा मानणारे नगरपालिकेचे अध्यक्ष लालाजी यांच्यातील आहे. खरे पाहिले असता भांगे आणि लालाजी यांच्यात संघर्ष होण्याचे कारण नव्हते; कारण दोघांचाही प्रमाणिक उद्देश आपल्या शहराचा चांगल्या प्रकारे विकास करणे हा होता. सुरुवातीच्या काळात लालाजी यांना भांगे यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक वाटले आणि त्यांच्या मदतीने आपल्या शहराचा विकास होईल असेही वाटले. पण नंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. दोघेही नि:स्पृह आहेत. दोघांनाही शहराचा विकास हवा आहे; पण लालाजी हे राजकारणी आहेत. त्यांना राजकारण सांभाळून, आपले नगरसेवक व पाठीराखे यांचे हितसंबंध जपत पुढे जायचे आहे; तर भांगे यांना शहराचा विकास करीत असताना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करीत विकासाचे व समाज कल्याणाचे कार्यक्रम पुढे रेटायचे आहेत; कारण नगरसेवकांना मलिदा खाऊ देणे म्हणजे जनतेचे नुकसान करणे असे त्यांचे मत होते. लालाजी व भांगे यांच्यात संघर्ष तीन बाबीत होता. लालाजींना भांगे आपणास न विचारता, आपल्याशी चर्चा न करता महत्त्वाचे निर्णय घेतात याचे वैषम्य वाटत होते. भांग्यांनी अतिक्रमण काढण्याचा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा निर्णय आपणास न विचारता घेतला याचा पण त्यांना राग आला होता. तिसरी गोष्ट म्हणजे हद्दवाढीसारखे व इतर अनेक निर्णय लालाजींचे नातेवाईक व पाठीराखे यांना अडचणीचे वाटत होते; म्हणून वरकरणी जरी लालाजी पाठिंबा दाखवत असले तरी भांगे यांची बदली करण्यास त्यांची भूमिका होती; कारण इतका स्वतंत्र बुद्धीचा कायद्यानुसार चालणारा अधिकारी त्यांना नको होता. पण भांग्यांच्या बदलीमुळे लालाजींची बाजू कमजोर होईल हे त्यांचे मित्र वकील बाबू यांनी ओळखले होते व झालेही तसेच; कारण लालाजींच्या अधिकाराचा नैतिक पाया दुर्बल झाला.

 चौथ्या पातळीवरचा संघर्ष नगरपालिकेची भ्रष्ट प्रशासन यंत्रणा, त्यास तोलून धरणारे राजकीय नेते व नागरीसमाज यांच्यामधील आहे. हा संघर्ष अत्यंत क्षीण स्वरूपात त्यांनी दाखवला आहे. कारण सर्वच पातळीवर नागरी समाजात जागृती नाही. त्यात आबा गुरुजी आहेत, जे शिक्षक गृहनिर्माण सोसायटीसाठी प्रयत्न करतात, पराभूत होतात आणि माघार घेतात. दुसरे कर्नल मोडक आहेत जे हॉटेल दिलबहारच्या बेकायदा बांधकामाविरूद्ध खासदारांकडे तक्रार करतात; पण खासदार

१५२ □ अन्वयार्थ