पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भांगे यांना आपण ज्या शहरात शिकलो त्या शहराचा विकास करावयाचा आहे व त्यासाठी ते जिद्दीने काम करावयास तयार आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास नगरसेवक, नगरपालिकेचे प्रशासन व सर्वसाधारण जनता यांना विश्वासात घेऊन काम करावे लागते व जेणेकरून नगरपालिकेचे अहित होत नाही हे पाहावे लागते. आहेत नगरप्रशासनातील इतर घटक समाजातील हितसंबंधी व दबाव गटांना नगरपालिकेचे हित डावलून आपला स्वार्थ साधायचा असतो. त्यात जकात बुडवणे, कर चुकवणे, अनधिकृत बांधकाम करणे. सार्वजनिक उपयोगासाठी सरकारने ठेवलेल्या जुन्या आरक्षित जागा अनारक्षित करणे, बेकायदा गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करणे, नरगपालिकेच्या जागा ताब्यात घेणे, या गोष्टींचा समावेश होतो. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळेवर काम करणे लोकांना आवश्यक त्या सेवा वेळेत पुरवणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. भांगे यांनी हे कार्य हाती घेऊन ती त्यांनी निर्धाराने पूर्ण करण्याचा धडाका लावला. त्यामुळे नगरसेवकांचे व प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात आले. भांगे यांनी तडफदारपणे हा एकहाती संघर्ष कशाप्रकारे केला याचे रोमहर्षक चित्रण देशमुखांनी या कादंबरीत केले आहे. भांगे निर्भय आहेत व प्रशासनाला त्यांनी चांगल्याप्रकारे आपल्या कामास जुंपले आहेत. त्यांना लालाजी यांच्याकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही पण ते जकात, आरोग्यसेवा, सफाई, गटारे दुरुस्ती, रस्ते, पूल, याबाबतीत . धडाक्याने काम करतात.

 त्यांचा नगरसेवकांशी संघर्ष, झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण निर्मूलनाच्या वेळी होतो; कारण नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून सुमारे १०० कुटुंबं तेथे रहात होती व त्यातील बहुसंख्य मागास जातीतील मुस्लीम व गरीब घरांतील होते. १०० कुटुंबांचे भवितव्य आणि नगरपालिकेने, पर्यायाने नागरिकांचे हित यातील हा संघर्ष होता; पण विरोधाला न जुमानता भांगे यांनी अतिक्रमण निर्मूलनाचा कार्यक्रम अंमलात आणला. हे करीत असतांना गरीब लोकांना आपण बेघर करीत आहोत याचे त्यांना दु:ख होते तर अतिक्रमण काढणे हे त्यांचे कर्तव्य होते. हा आपल्या मतपेटीवर हल्ला आहे हे लक्षात येताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी काहूर केला आणि नगरपरिषदेत त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भांगे यांची बदली होणार हे नक्की झाले. व त्यांची बदली झाली. भांगे यांची कथा ही एकमेव कथा नाही आणि भारतात अनेक कर्तव्यदक्ष चारित्र्याचे कर्तव्यकठोर अधिकारी आपले कर्तव्य करीत असतांना बळी गेलेले आहेत. आज सर्वच शहरांत नगरपालिकांच्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. या जागा कधी गरीबांच्या झोपड्यांनी व्यापलेल्या आहेत. तर कधी त्या धनदांडग्यांच्या ताब्यात आहेत. त्यावर कारवाई करून सार्वजनिक हिताचे कशाप्रकारे संवर्धन करावयाचे हा मोठा प्रश्न आहे; कारण येथील मुख्य प्रवृत्ती सार्वजनिक

अन्वयार्थ □ १५१