पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करते. मूळच्या मुस्लीम समाजातील उच्च-नीचतेच्या कसोट्या, स्त्रियांचे सर्वांगीण शोषण, अतिधर्मांधता यामुळे दहशतवाद कसा जन्म घेतो याचे अत्यंत सूक्ष्मपणे चित्रण करणारी ही कादंबरी मराठीतली महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. अफगाण, पाकिस्तान, रशिया, अमेरिका यांच्या संबंधामुळे आणि शीतयुद्धामुळे जसे जग धोक्यात आले; तसेच मार्क्स-लेनिनच्या सर्वांगीण क्रांतीतील रक्तरंजितपणामुळे समाजवादही धोक्यात आला. संशय बळावला. राजकारणाने हिडीस रूप घेतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाची पाळेमुळे रोवली गेली. या सगळ्यांस कारणीभूत आहे सर्वांगीण विकासाचा अभाव. आणि हा सर्वांगीण विकास फक्त लोकशाही प्रणालीमध्ये अवतरू शकतो. म्हणूनच एका भारतीयाला अफगाणचा विषय हाताळावा वाटणे यातही देशमुखांची लोकशाही व्यवस्थेवरची प्रगल्भ जाण आणि विश्वास व्यक्त होतो. अफगाणमधले चित्रण करताना मार्क्सवादसुद्धा एकांगी कसा राहतो, याचीही चिकित्सा देशमुख करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय हाताळताना देशमुखांनी अत्यंत तटस्थपणे आणि तितक्याच तीव्र संवेदनशीलतेने हाताळला आहे. पृष्ठसंख्या जास्त असल्यामुळे पुनरुक्ती झाल्यासारखी वाटत असली तरी अत्यंत सूक्ष्म तपशिलांमधून दहशतवाद व धर्माधता कशी वाढीस लागते; माणसांचे स्वार्थ आणि अविवेकी, एकांगी विचार विवेक कसा संपवून टाकतात याचे नेमके तपशील ही कादंबरी देते. याही कादंबरीत अधिक प्रकाश शासन आणि प्रशासनावरच आहे. या दोन प्रणालींमुळे संपूर्ण व्यवस्था कशी मोडकळीस येते, याचे प्रत्यंतर ही कादंबरी देते.

 देशमुखांच्या कादंबऱ्यांमधील पात्ररचनाही लक्षणीय आहे. 'सलोमी' एक शोषित मुस्लीम तरुणी आहे. आपले स्त्री म्हणून मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण कसे झाले हे सांगताना कोणताही आडपडदा ठेवीत नाही. तीच दिलीपची तहा. आपल्यावर होणारे जातीय अन्याय तो स्पष्टपणे नोंदवतो. पण त्याचवेळी याच भारतीय व्यवस्थेत राहूनच तिला धक्के द्यायचे नक्की करतो. 'अंधेरनगरी' ही संपूर्ण व्यक्तिरेखाच बनून येते. राजकीय व्यक्ती ह्या नगरीचे लचके सगळीकडून कसे तोडतात याचे चित्रण करताना जी पात्रे येतात ती काळ्या अथवा पांढऱ्या रंगात रंगवली जात नाहीत; ती स्वाभाविकपणे येतात. पण 'अंधेरनगरी'त पात्रांची इतकी गर्दी होते की, त्या गर्दीत एक चांगला विषय हरवून बसतो. एखादे पात्र वाचक म्हणून लक्षात येईपर्यंत लगेच दुसरे नवीन पात्र अवतरते. त्याचा तपशील गोळा करेपर्यंत तिसरे अवतरते. या पात्रांच्या मालिकेमुळे कादंबरी निम्म्याच्या पुढे जाईपर्यंत वाचकांच्या हाती येत नाही. आणि एखादे नवीन पात्र आले की त्याला साकारताना लागणारे तपशील लगेच भरत राहिल्यामुळे कादंबरीची गुणवत्ता उणावत जाते. ही कादंबरी पात्रांच्या गर्दीमुळे गांभीर्य हरवून बसते. अगदी शेवटी-शेवटी ती वाचकांची पकड घेते. हीच तन्हा 'इन्किलाब

अन्वयार्थ □ १४५