पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षा दिली जाते. मग आपोआपच लोकशाहीचा एकेक चिरा ढासळू लागतो. शासन आणि प्रशासनाने लोकशाहीला किती विकृत रूप दिले आहे, याचा प्रत्यय ही कादंबरी देते. जर आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावली तर कुणावर अन्याय होणार नाही. झाला तर मग 'ऑक्टोपस'मधल्या भगवान काकडेसारख्या प्रामाणिक माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते. त्यातून काकडे पुन्हा सावरतो; पण भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनण्याशिवाय त्याच्याकडे कसलाच पर्याय उरत नाही. निलंबित झालेला तलाठी भविष्यात अव्वल कारकून होऊन महत्त्वाच्या पदावर कार्यरत होतो व भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून आनंदसारखा कलेक्टर आपल्या पदाचा राजीनामा देतो. भ्रष्ट व्यवस्थेचा केवळ राजकारणावर किंवा समाजकारणावर परिणाम होत नाही; तर तो शिक्षणावर आणि बालमनावरही होतो याचे प्रत्यंतर 'ऑक्टोपस'मध्ये येते. भगवानचा मुलगा आणि एस.पी.ची मुलगी या भ्रष्ट व्यवस्थेच्या शिकार बनतात. याचे अधिक प्रभावी चित्रण 'हरवलेले बालपण' मध्ये सापडते. बालमजुरीमळे एकेक पिढ्याच्या पिढ्या कशा बाद होतात आणि अकाली मृत्यूला बालपणीच कसे सामोरे जावे लागते, याचे चित्रण करताना देशमुखांनी महाराष्ट्र आणि बिहारमधील बालमजुरीचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळला आहे. बालमजुरांच्या खरेदीची आंतरराज्यीय टोळी किती विकृतपणे बालकांचे आयुष्य संपवून टाकते आहे, याचे चित्रण करताना देशमुख प्रशासकीय व्यवस्थेवर बोट ठेवतात. बालकांच्या पुनर्वसनाचा कायदा व विभाग असतानाही ही व्यवस्था किती बेजबाबदारपणे काम करून बालकांचे बालपणच कसे संपवून टाकते, याची चिकित्सा केली आहे. एखाद्या गुंडापुढे राजकारणी आणि मग राजकारण्यांच्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्था कशी झुकते आणि त्यातून बालमजुरीचा प्रश्न कसा गंभीर बनत जातो, याचे अत्यंत तपशिलात चित्रण ही कादंबरी करते.
 या कादंबऱ्या केवळ शोषणाचे चित्र नोंदवून थांबत नाहीत; तर भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक शोषणप्रकाराला उत्तर आहे आणि पर्यायही आहेत. पण ते राबवण्याची मानसिकता या व्यवस्थेमध्ये उरली नसल्याचे लक्ष्मीकांत देशमुख नोंदवतात. ही नोंद करताना ते एका अर्थाने लोकशाही व्यवस्थेचे मजबूत दुवे काय आहेत, याची नोंद करायला विसरत नाहीत. अंतिमत: लोकशाही ही सामान्य माणसांच्या कल्याणासाठीची प्रक्रिया आहे, ती विसरून चालणार नाही. याचे समग्र भान असणारे देशमुख आपल्या कादंबरी लेखनातून लोकशाहीच्या बळकटीकरणाची प्रक्रिया तर नोंदवतातच; परंतु कांदबरीचे अधिकाधिक लोकशाहीकरण करतात.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कांदबरी जरी अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास अधोरेखित करीत असली तरी धर्मांधता, हुकूमशाही यामुळे केवळ एक देशच नव्हे; तर संपूर्ण जागतिक व्यवस्था कशी अडचणीत येऊ शकते, याची मांडणी ही कादंबरी

१४४ □ अन्वयार्थ