पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संपवते असे नाही; तर संपूर्ण आयुष्यात पोखरून टाकणारी, शारीरिक, लैंगिक शोषण करणारी प्रथा असल्याचे या कादंबरीच्या निमित्ताने लक्ष्मीकांत देशमुख नोंदवतात.
 या सर्वच कादंबऱ्यांच्या आशयसूत्रांचा विचार करताना प्रमुख गोष्ट लक्षात येते ती शोषण. कादंबऱ्यांचे नायक बहुतांशी उच्चकुलीन, श्रीमंत, उच्चवर्णीय, अधिकारी श्रेणीचे आहेत. तरीही कादंबरीचा केंद्रबिंदू ‘शोषणाला नकार' हा आहे. 'सलोमी' स्त्रीशोषणाला, लैंगिक शोषणाला नकार देते. 'दिलीप' जातीय शोषणाला आणि भोगवादाला नकार देतो. अन्वर, डॉ. अनाहिता (इन्किलाब...) मुस्लीम कट्टरपंथीय शोषणाला नकार देतात. भांगे मुख्याधिकारी (अंधेरनगरी) राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्ट व्यवस्थेला नकार देतात. आनंद पाटील (ऑक्टोपस) आपले स्खलन थांबवण्यासाठी कलेक्टरपदाचा राजीनामा देऊन भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होण्यास नकार देतात. अरुण पालिमकर स्वत:चे बालपणी झालेले शोषण लक्षात घेऊन आयुष्यभर बालमजुरीच्या प्रथेविरुद्ध लढा देतात. 'सलोमी' आणि 'दिलीप' वगळता शोषितांची भूमिका जगणारी मुख्य पात्रे लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीत फारशी आढळत नाहीत. परंतु ज्या मुख्य व्यक्तिरेखा अधिकारी, राजकारणी, सत्ताधीश आहेत त्यांच्याकडून शोषणाला नकार देण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक कादंबरीत दिलेला दिसतो; आणि हे त्यांच्या कादंबऱ्यांचे लक्षणीय यश आहे. आपण शोषित, पीडित नाही आहोत. अधिकारी, राजकारणी आहोत. उच्चकुलीन आहोत याचे भान जपूनही ही पात्रे शोषणाच्या विरोधात ठामपणे उभी राहतात. प्रसंगी प्रवाहपतित होतातही. परंतु ती पुन्हा फिनिक्सप्रमाणे उभारी घेऊन लढायला सिद्ध होतात.
 मॅनेजर पांडेयचे विधान अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे कारण लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबऱ्यांमधून लोकशाहीच्या बळकटीकरणाची प्रक्रिया होताना दिसते. लोकशाहीचे जे शासन, प्रशासक, न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमे हे चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या चार स्तंभावरती जी भारतीय लोकशाही उभी आहे, त्या स्तंभांचा लोकशाही बळकटीकरणात किती प्रभावी वापर झाला आहे, याची चिकित्सा देशमुख करताना दिसातत. 'सलोमी' या कादंबरीचा अपवाद सोडला तर पुढच्या चारही कादंबऱ्यात लोकशाहीच्या भल्या-बुऱ्याची चिकित्सा केलेली आहे. लोकशाहीने जे घटनादत्त अधिकार माणसाला प्राप्त झाले त्यांचा वापर प्रत्येक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी स्वार्थासाठी कसा करून घेतो याचे प्रभावी चित्रण 'अंधेरनगरी'त आहे. नगरपलिकेला जर उत्तम प्रशासन करणारा एखादा मुख्याधिकारी मिळाला तर शहराचा चेहरा-मेहरा बदलू शकतो याचे चित्रण या कादंबरीत आले आहे. परंतु असा प्रशासक या व्यवस्थेला चालत नाही. मग त्याची बदली अडचणीच्या आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात करून त्याला

अन्वयार्थ □ १४३