पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठार मारण्याची कृती करण्यामागं स्त्रीला किती टोकाचा भावनिक व मानसिक ताण, छळ सहन करावा लागतो, ते त्या स्त्रीलाच माहीत असतं. मुलगी झाली तर पुन्हा घरी, सासरी जाता येणार नाही, माहेरी राहून अपमानित जिणं स्वीकारावं लागेल याचं भय स्त्रीला अशी अमानवी कृती करायला भाग पाडतं.
 या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिसरातील स्त्री संघटना गंभीरपणे या समस्येचा वेध घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. भारतीय महिला फेडरेशननं २००७ - २००८ या काळात संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPO) या संस्थेसोबत पन्हाळा तालुक्यात 'कन्या वाचवू या' ही व्यापक मोहीम राबवली. या मोहिमेच्या अंतर्गत प्रामुख्यानं समाजप्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. लोकांना मुलीच्या जन्माबाबत भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न झाला. मुंबईतील ‘एक्सपेरिमेंटल थिएटर फाऊंडेशन' चे श्री. मंजुल भारद्वाज यांच्या साहाय्यानं 'कन्या वाचवू या' या विषयावर शालेय व महाविद्यालयीन तरुणांची दोन पथनाट्य शिबिरं आयोजित केली. त्यातून विद्यार्थ्यांकडून संहितालेखन, नाट्य दिग्दर्शन व अभिनय अशा सर्वच स्तरांवर काम करून घेण्यात आलं. मंजुल भारद्वाज यांच्या 'थिएटर ऑफ रिलेव्हन्स' या तत्त्वज्ञानानुसार झालेल्या नाट्यनिर्मिती प्रक्रियेतून सहभागी तरुण - तरुणींचा स्त्रीभ्रूण हत्या व विषयाशी वैचारिक व भावनिक बंध जुळला. या नाटकांचे १०० च्या वर प्रयोग पन्हाळा तालुक्यात खेडोपाडी करण्यात आले. कलाकार विद्यार्थी नाट्यप्रयोगानंतर गावातील लोकांशी बोलत, चर्चा करत. शालेय गटातील एका कलाकार मुलीनं तिच्या गावात सर्वांसमक्ष आपल्या कुटुंबात काकीवर गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी करण्यास दडपण आणले जात असल्याची चर्चा जाहीरपणे केली आणि असे करण्यास आपला विरोध असल्याचं सांगितलं. नाटक पाहून अश्रू ढाळणाऱ्या काही मातांनी स्वत: गर्भपात करून घेतल्याचं कबूल केलं आणि पुन्हा गर्भलिंग निदान न करण्याचा संकल्प केला. नाटकाच्या माध्यमातून समाजातील प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्था, कुटुंबातील स्त्री-पुरुष विषमता, स्त्रियांचा अपत्य जन्माचा व गर्भपाताचा अधिकार, गर्भपाताविषयीच्या कायद्याच्या स्त्रीगर्भ हत्येसाठी होणारा गैरवापर, समाजात मुलांइतकंच मुलींच्या जन्माचं महत्त्व अशा विविध मुद्द्यांवर सर्वच स्तरांवरील लोकांच्यात एक वैचारिक मंथन घडवून आणण्यासाठी महिला फेडरेशन प्रयत्नशील राहिली.
 याच दरम्यान शालेयपूर्व शिक्षण घेणाऱ्या वयोगटातील म्हणजे अंगणवाडी व शिशुगृहातील मुलांच्या पालकांच्या अनौपचारिक बैठका घेतल्या. बहुसंख्य पालकांचं पहिलं वा दुसरं मूल अशा संस्थांत शिकायला असतं. पहिल्यावहिल्या अपत्यप्राप्तीचा आनंद, त्याचं कौतुक त्यांच्या जीवनात एक मौल्यवान आनंद
१३४ अन्वयार्थ