Jump to content

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून या कथेकडे पाहिले आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न, विकास-प्रगतीच्या पाऊलखुणात आलेल्या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर या कथेचे वेगळेपण मांडले आहे..
  चित्रकार व कवी भ. मा. परसावळे यांनी देशमुख यांच्या कथेतील एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधले आहे. 'पाणी पाणी' व 'नंबर वन' या कथासंग्रहातून व्यक्त होणाऱ्या समकालातील जातिप्रश्नांच्या अंगाने चर्चा केली आहे. आजच्या काळातही जातिभेदाचे दाहक प्रश्न अजूनही अस्तित्वात आहेत. या प्रश्नाकडे देशमुख लेखक म्हणून सहानुभवाने पाहतात. या मागे त्यांच्यात संवेदनस्वभाव इहवादी, विज्ञाननिष्ठ भूमिका असल्याचे नोंदवितात. .
 मंगेश कश्यप यांनी 'पाणी पाणी' या संग्रहातील कथांकडे काहीशा शास्त्रीय दृष्टीने पाहिले आहे. भूजलातील साठे, त्याचे वितरण व प्रशासनातील गुंते या अंगाने कथेतील आशयसूत्रांची चर्चा केली आहे. शेती व ग्रामीण जीवनाच्या अर्थव्यवस्थेच्या पाणी व्यवस्थापन वितरणाचा संबंध सांगून त्यातले गुंते नोंदविले आहेत. देशमुख यांच्या ललित लेखनाने जलभानसंवेदना प्रभावी मांडल्याचे सांगितले आहे..
  प्राचार्य सुनीलकुमार लवटे व प्रा. मिलिंद जोशी यांनी 'नंबर वन' या कथासंग्रहाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. खेळाडूचा जीवनसंघर्षाचा व माणूसपणाची शोधयात्रा या कथामालेतून प्रकटल्याचे नोंदविले आहे. थीमबेस्ड कथामालेतील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा देशमुखांचा एक वेगळा कथा आविष्कार. प्रा. पुष्पा भावे व डॉ. मेघा पानसरे यांना महाराष्ट्रातील या प्रश्नाची निकड व दाहकतेच्या पार्श्वभूमीवर या कथालेखनाचे वेगळेपण नोंदविले आहे. या कथांचा भूगोल संदर्भ व या प्रश्नावरील जागृतीच्या पार्श्वभूमीवरील हे विवेचन आहे. पुष्पा भावे यांनी या लेखनाकडे समाजवास्तवाचा ललित दस्तऐवज म्हणून याकडे पाहिले आहे, तर मेघा पानसरे यांनी या प्रश्नाच्या समकालीन पाश्र्वभूमीवर कथासंदर्भ न्याहाळले आहेत. भारतीय समाजात असलेल्या पितृसत्ताक दृष्टीचा समाजरचनेवर असलेला प्रभाव आणि स्त्री नेहमीच सत्तासंबंधात बळी पडली आहे. या सामाजिक, राजकीय अंगाने विचार केला आहे. कोल्हापूर परिसरातील या प्रश्नासंबंधीचे देशमुखांचे कार्य आणि त्यामुळे झालेली जाणीवजागृती या संदर्भाचाही विचार करीत या कथांचे वेगळेपण शोधले आहे व नेमकेपणाने मांडला आहे..

**

 लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीविश्व वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. त्यांच्या एकूण पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. या कादंबऱ्यांतून विविध प्रकारची आशयसूत्रे व्यक्त झाली आहेत. प्रशासन व्यवस्था, राजकारण, समाजकारण ते आंतरराष्ट्रीय संस्कृतिसंबंधाचे चित्रण देशमुख यांच्या कादंबरीतून आले आहे. देशमुख यांच्या कादंबरी लेखनाचा परामर्श घेणारे जवळपास सोळा लेख या संग्रहात समाविष्ट आहेत.

अन्वयार्थ □ १३