पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा मेटाबोलिक विकृती किंवा गुणसूत्रातील विकृती, जन्मत: व्यंग किंवा लिंगसंबंधित विकृतीचे निदान होऊन जन्माला येणाऱ्या बाळांचा जन्मभराचा ताप वाचावा आणि पालकांना जन्मभराच्या वेदना, तगमग यापासून वाचवावे असा हेतू होता. पण 'मुलगा हवा' या भारतीय ध्यासाने त्याचा विनियोग स्त्रीभूणहत्येच्या मार्गाने संतती नियमन करण्यासाठी केला. व्यावसायिक नीतिमत्तेचा विसर पडलेल्या धंदेवाईक डॉक्टरांनी त्यातून ‘पाचशे करोडची इंडस्ट्री' (शब्द देशमुखांचा) उभी केली. जुन्या मार्गाने होणारी स्त्रीभ्रूणहत्या चालूच होती. त्यात आता नव्या तंत्रज्ञानाची भर पडली. स्त्रीकार्यकर्त्यांनी याविषयी बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्या स्वत:च मुक्तीच्या मार्गाआड येत असल्याची तक्रार काही वैद्यकीय व्यावसायिकांनी आणि स्वयंघोषित समाजशास्त्रज्ञांनी केली. स्त्रीभूणहत्येमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर सामाजिक परिणामांची दखल केवळ काही चर्चासत्रांच्या मर्यादित अवकाशात घेतली जात होती. मात्र २००१ च्या जनगणनेच्या निष्कर्षांनी वस्तुस्थिती किती गंभीर आहे हे प्रकाशात आणले.
 महाराष्ट्रात मात्र यापूर्वीच या वस्तुस्थितीची दखल देऊन चर्चा चालू झाली होती. अभ्यासक कार्यकर्ते रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी विशेष पुढाकार घेतला होता. आणि त्या काळातील विधानसभा सदस्य मृणालताई गोरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात या विषयीचा कायदा झाला त्याला PCPNDT अशा संकेतनामाने संबोधिण्यात आले. १९८८ साली 'महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ प्रिनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक अॅक्ट' हा कायदा लागू केला, तर राष्ट्रीय पातळीवर प्रसूतीपूर्व निदान तंत्र (विनियमन व दुरुपयोगवरील प्रतिबंध) कायदा २० सप्टेंबर १९९४ रोजी पास झाला.
 या प्रकारचे कडक कायदे झाल्यावर अल्ट्रा सोनोग्राफीचे धंदे भूमिगत झाले, बालिका जन्मदर घटू लागला. (विशेषत: शून्य ते सहा वर्षातील बालिकांचे प्रमाण घटू लागले) समहितैषी नागरिकांना त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या, त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशातून २००३ साली कायद्यात सुधारणा झाली. अनिष्ट जाहिरातींवर बंदी आली. अल्ट्रासाउंड मशिनविक्रीचे नियमन करण्यात आले. परंतु अवैध धंद्यातून (या स्वरूपाच्या संदर्भात 'व्यवसाय' शब्द योजणे अवघडच) मिळणाऱ्या पैशाचा मोह, सुबत्तेची लालसा आवरणे अनेक डॉक्टरना अशक्य होऊ लागले आहे. आपल्याला मृत्यूनंतर तर्पण करायला मुलगा हवा, आपले आडनाव चालविणारा मुलगा हवा, वारसदार हवा, अशी इच्छा असणाऱ्या पुरुषांना वंशाचा दिवा हवा होता. त्यामुळे डॉक्टर आणि पुरुषसत्ताक कुटुंबाची मनोवृत्ती याची युती होऊ लागली.

 एका बाजूला तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करायचा आणि दुसऱ्या बाजूला गुणसूत्रांची

अन्वयार्थ १२९