पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रीभ्रूणहत्या प्रश्नाचा ललित दस्तऐवज


प्रा. पुष्पा भावे


 प्रशासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तीने त्या सेवेच्या निमित्ताने आलेल्या जीवनानुभवाचा साहित्यिक आविष्कार करणे हे काही मराठी वाचकांना नवीन नाही. या स्वरूपाच्या लेखनाला ललित मानायचे की अललित असा प्रश्न लेखकाने मनोगतात उपस्थित केला आहे. अनुभव कल्पित असणे आणि प्रत्यक्ष असणे यातील अंतर लेखकांच्या मनात असावे. या शिवाय लेखकाने 'थीम बेस्ड' कथासंग्रह असा शब्द योजला आहे. एकाच विषयसूत्रावरचे कथासंग्रह असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. अरविंद गोखल्यांसारख्या कथेचा ध्यास असणाऱ्या लेखकानेही असे संग्रह निर्माण केले होते. चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनात एकाद्या शैलीने वा रंगलेपनाच्या पद्धतीने झपाटलेले कालखंड आपण पाहतो, पण त्यामागची प्रक्रिया वेगळी असते.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी यापूर्वी दोन विषयसूत्रांशी निगडित कथासंग्रह 'पाणी! पाणी!' आणि 'नंबर वन' मराठी वाचकांसमोर ठेवले होते. एखादी सामाजिक समस्या, ती ज्या समाजात निर्माण होते त्याचे पर्यावरण, त्या समस्येत गुंतलेल्या माणसांचे संबंध याचा विचार फार गुंतागुंतीचा असतो. ती समस्या ज्या दृष्टिकोनातून निर्माण होते, त्यामुळे माणसामाणसातील संवाद तुटणे, विसंवाद होणे हे तर होतेच. पण माणसे आपल्या नेहमीच्या स्वभावापेक्षा वेगळ्या चालीने आणि अपराधभावाने स्वत: विद्धही होतात.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासमोर स्त्रीभ्रूण हत्येची समस्या आहे. ही समस्या नवी नाही. वेगवेगळ्या समाजाने मुली नाहीशा करण्यासाठी वेळोवेळी अनेक मार्ग योजलेले आपण पाहिले आहेत. पण अशी प्रथा समाजाच्या मूकसंमतीने प्रत्यक्षात येते आणि सर्व समाज जणू काही काही घडलेच नाही असा आव आणीत असतो. गर्भनिदानाचे आधुनिक तंत्र प्रत्यक्षात आणताना प्रसूतिपूर्व जनुकीय विकृती








१२८ अन्वयार्थ