पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत, त्या कथांमधील व्यक्तिरेखांना समजून घेणे वाचकांना अधिक सोयीचे जाते. त्यामुळे क्रीडा या विषयाची आवड नसलेल्या वाचकांमध्येही ते त्यांच्या कथावाचनाची आवड निर्माण करू शकतात.
 साहस, प्रेम, राग, लोभ, महत्त्वाकांक्षा आणि उत्कट भावना हे सर्वच माणसांच्या ठायी असणारे ठळक गुण आहेत. आपण अमुक एका मार्गाने गेलो तर आपल्या वाट्याला उपहास, उपेक्षा, उपमर्द आणि अपेक्षाभंग येईल हे माहीत असूनही माणसे त्या मार्गाने जातच असतात. जीवनाच्या व्यर्थतेतला अर्थ शोधणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणि तीच त्याच्या माणूसपणाची खरी खूण आहे. हीच त्याच्या माणूस असण्याची कसोटी आहे. देशमुखांच्या कथांमधील व्यक्तिरेखा या माणूसपणाच्या कसोट्यांवर पूरेपूर उतरतात म्हणूनच त्या उपऱ्या किंवा परक्या वाटत नाहीत. त्या आपल्यातल्याच एक वाटतात. त्यामुळे त्यांच्या कथाविश्वाशी वाचक सहजपणे एकरूप होऊन जातात. माणसाचे जीवन सीमित आहे. लांबी, रुंदी आणि खोली हे शब्द केवळ क्षेत्रफळाशी निगडित असतात असे नाही. त्याचा मानवी जीवनाशी, जीवनव्यवहाराशी खूप जवळचा संबंध असतो. लांबी म्हणजे माणसाला लाभलेले आयुष्य, रुंदी म्हणजे त्याचे जगणे. खोली म्हणजे त्याला सापडलेला जीवनाचा अर्थ. साहित्यकृती म्हणजे घटना-प्रसंगांची जंत्री नसते, तर त्या लेखकाची ती जीवनदृष्टी असते. त्या आधारे जीवनातल्या अनुभवांचा अन्वयार्थ ती लावत असतो. स्वत:चे जीवनचिंतन तो मांडत असतो. लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'नंबर वन' या कथासंग्रहातून केवळ खेळाडूंच्या आयुष्यातल्या कहाण्या किंवा गोष्टी सांगितलेल्या नाहीत. सकस कथा-बीजाच्या आधारे खेळाडूंच्या जीवनदृष्टीचेही त्यांनी प्रभावीपणे दर्शन घडविले आहे.
 त्यांनी कथालेखनाची स्वतंत्र शैली कमावलेली आहे. त्यांची भाषा चित्रदर्शी आहे. पाण्यासारखी प्रवाही आहे. वाचनीयता हाच कोणत्याही साहित्याचा श्रेष्ठतेच्या निकषांपैकी एक असते. त्यांच्या साऱ्याच कथा वाचनीय आहेत. 'नंबर वन' असे शीर्षक असलेल्या या कथासंग्रहाला गुणवत्तेच्या बाबतीतही नंबर वन देता येईल इतका हा सुरेख कथासंग्रह आहे.








अन्वयार्थ १२७