गर्भात मारलेल्या लेकी' हा संग्रह प्रकाशित झाला. देशमुख यांच्या कथालेखनाधारित अकरा लेखांचा समावेश या संग्रहात आहे.
डॉ. राजशेखर शिंदे यांनी देशमुख यांच्या कथेतील जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन सौंदर्याचा शोध घेतला आहे. देशमुख यांच्या कथेतील विकासक्रमाचा व विविध वळणांच्या अनुषंगाने कथेतील आशयसूत्रे व शैलीचा शोध घेतला आहे. देशमुख यांच्या लेखनसंवेदनशील स्वभावाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. या लेखात कथावाचनाची आस्वादरूपे आहेत. डॉ. केशव तुपे यांनी देशमुख यांच्या कथेतून प्रकटणारी मुख्य जाणीवसूत्रे ध्यानात घेऊन कथावाचन केले आहे. स्त्री-पुरुष प्रेमसंबंधापासून समस्याप्रधान विषय त्यांच्या कथेतून कसे आले आहेत त्याची चर्चा केली आहे. बाह्य जीवनाचे तपशील त्यांनी कथेत कसे पुरवल्यामुळे या कथांना प्राप्त झालेली परिमाणात्मकता नोंदविली आहे. सामाजिक आशयसूत्रांना जोरकसपणे पॉईंटआऊट करणाऱ्या देशमुख यांच्या कथा मराठीत आगळ्यावेगळ्या ठरतात हे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. डॉ. आनंद पाटील यांनी देशमुख यांच्या कथेबद्दलची मोठ्या सांस्कृतिक फलकावर नोंदवलेली तौलनिक निरीक्षणे महत्त्वाची आहेत. सूक्ष्म कथावाचनाचे व तीमधील सुसंगत अन्वयार्थाचे तपशील त्यांच्या विवेचनात आहेत. या संहितांचा अर्थ लावण्यासाठी त्यांनी वाङ्मयबाह्य तपशीलाचाही उपयोग केला आहे. एकार्थाने त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा लेख संहितापूर्व संहितांचे वाचन (EPI - TEXTS) आहे. देशमुख यांच्या कथेतील अनुभवविश्व अनेकतावादी असल्याचे सांगून, अनिल अवचटांच्या सामाजिक कार्यातून जन्मलेल्या माणसांप्रमाणे विकास प्रशासनाच्या ध्यासातून जन्मलेल्या रिपोर्ताज वळणाच्या या कथा आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे..
विष्णू पावले यांनी देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपदर्शनाचा विचार केला आहे. देशमुख यांच्या कथेतून स्त्रीजीवनाचे विविधरंगी चित्रण आलेले आहे. माता, भगिनी, सहचारिणी व प्रेयसी रूपातील चित्रणाचे वेगळेपण शोधले आहे. तसेच या जीवनचित्रणामागे असलेला समाजसंदर्भही ध्यानात घेतला आहे. स्त्रीदुःखाचा व शोषणाचा सांस्कृतिक संदर्भ ध्यानात घेऊन त्यासंबंधीचे आकलन मांडले आहे. विशेषत: ‘पाणी! पाणी!!' मधील स्त्री-दु:खानुभूतीचे व शोषणाचे ‘साती आसरा' च्या रूपकातून मांडलेला अन्वयार्थ वेगळा आहे..
देशमुख यांच्या स्वतंत्र कथासंग्रहावरील लेखही या संग्रहात समाविष्ट आहेत. त्या त्या कथासंग्रहाचे सामर्थ्य अधोरेखित करणारे. 'पाणी! पाणी!!' या संग्रहावर ना. धों. महानोर, शंकर सारडा व मंगेश कश्यप यांनी लिहिले आहे. नामवंत कवी व शेतीप्रश्नाचे अभ्यासक ना. धों. महानोर यांनी आजच्या ग्रामीण वर्तमानाच्या कथा