पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो काही रिकामपणाचा उद्योग नाही असा संस्कार रुजवणं आवश्यक असल्याचं लेखकाचं मत विचारणीयच नव्हे, तर अनुकरणीय आहे. सामाजिक धारणेत बदल करण्याच्या उद्देशानं हेतुत: लिहिलेल्या या कथांना जीवन व कला दोन्ही दृष्टींनी असाधारण महत्त्व आहे.
 पुण्यात सन २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा झाल्या. क्रीडा संचालक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांचा त्या वेळी क्रीडाविश्वाशी जवळून संबंध येतो. खेळाडूंमधील ईर्ष्या, जोश ते न्याहाळतात. त्यांचं जगणं, खेळाडूंतील मानवी संबंध ते अनुभवतात. क्रीडा संयोजक, मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू यांच्यामधील संबंधांचे बारकावे या प्रशासकातील साहित्यिक हेरतो, टिपतो अन् त्यातून अजाणतेपणी कथा आकार घेतात. क्रिकेट, बॅडमिंटन, रनिंग, स्विमिंग, शूटिंग अशा अनेक क्रीडाप्रकारांचा फेर धरत 'नंबर वन' मधील कथा समग्र क्रीडाविश्व शब्दबद्ध करतात.
 संग्रहात क्रिकेटचा वरचष्मा असणं स्वाभाविक आहे. तो खेळ ब्रिटिशांचा असला तरी भारतीयांसाठी मात्र धर्म, प्राण, श्वास बनून गेलाय. 'जादूचा टी-शर्ट', 'बंद लिफ्ट', 'अखेरचं षटक' आणि 'ब्रदर फिक्सेशन' या कथांमधून क्रिकेट खेळ, त्यातलं वैभव, ताण-तणाव, मानवी संबंध याची उकल करत भारतातील जातवास्तव, राजकारण, समाजजीवन कथाकाराने अधोरेखित केलं आहे. या कथासंग्रहाची जनक कथा म्हणून 'ब्रदर फिक्सेशन' कडे पाहाता येईल. माणसाच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचं गारूड, भूत असं असतं की, त्यापुढे तो आंधळा होतो नि मग नवरा नाही की अन्य कोणीही! 'ब्रदर फिक्सेशन' ची नायिका स्विटी. तिचा भाऊ क्रिकेटियर. त्याला ती भाई म्हणत असते. नवरा विकीही क्रिकेटियर. विकीच्या मनात भाईबद्दल ईर्ष्या असते, कारण त्यांच्या नावावर सतत हुकमी शतकं जमा होत असतात. नवरा विकी त्यापुढे फिका पडत जातो. विकीत खुत्रस निर्माण होतो. तो नाबाद द्विशतक झळकावतो. भारताला विजय मिळवून देतो. मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान पटकावतो. त्याला वाटतं स्विटी येईल, चुंबन - आलिंगन देईल; पण ती त्याऐवजी लाडिक व जीवघेणी तक्रार करते की, तू भाईला खेळू दिलं नाही, कॅलेंडर इयरमध्ये एक हजार रन पूर्ण करायचं स्वप्न उद्ध्वस्त केलंस इ. इ. हे आंधळेपण येतं 'ब्रदर फिक्सेशन'-च्या मनोधारणेतून.
 असंच फिक्सेशन 'अखेरचं षटक' कथेत पत्नी, प्रेयसीच्या द्वंदतून मोठ्या प्रत्ययकारी रूपात चित्रित झालंय. 'ती' संतोषची प्रेयसी असते. परप्रांतीय, परजात - धर्मीय म्हणून संतोषचे आई-वडील तिला नाकारतात. ती स्वधर्मीय सलीमला स्वीकारते खरी, पण पत्नी होऊनही तिच्यातली पूर्वाश्रमीची प्रेयसी जिवंत राहते.



१२० अन्वयार्थ