पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्याची शेतजमीन पाझर तलावाखाली संपादित केली जाणार आहे त्यांच्या जीवाची घालमेल आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रवृत्ती देशमुखांच्या कथांमध्ये प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे.
 पाणी वितरण हा एक न सुटलेला प्रश्न आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान कितीही या संदर्भात वापरले तरीदेखील पाण्याचे वितरण हा मोठा वादाचा विषय राहिला आहे. विकसित व अविकसित देश, शहरी व ग्रामीण विभाग, ग्रामीण भागातील बागायती आणि जिरायती विभाग, कोरडवाहू शेती असलेल्या गावातील असामान्य आणि सर्वसामान्य जनता यातील जो घटक अधिक शक्तिशाली तो नैसर्गिक साधनसामग्रीचा मालकी हक्काने वापर करू पाहतो आहे. एखाद्याला परवडते म्हणून पाचशे फूट खोलाची विंधन विहीर खणायला परवानगी द्यायची की नाही हे कोणी ठरवायचे? हा अधिकार कोणाचा ? हा खरा प्रश्न. असे असे अनेक प्रश्न देशमुखांच्या कथा वाचताना आपल्या पुढे फेर धरून नाचू लागतात.
 ग्रामीण महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था पाण्यावरच तर अवलंबून आहे. दुर्दैवाने याकडे संपूर्ण काणाडोळा करून पाण्याच्या, विशेषत: त्याच्या वाटपाच्या योजना आखल्या जात आहेत. पाण्यासारखी मूलभूत महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती विशिष्ट गटाकडे कशी ओढता येईल असेच प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे पाणी समस्येचे निराकरण केले नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल याचे भान 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहातून देशमुख आपल्याला देतात.
 भूजल प्रवाह जितके गुप्त त्यापेक्षाही जास्त गुप्तपणे सामान्यांची मुस्कटदाबी करून पाण्याची चोरी केली जाते. एखाद्या गावात भूजलावर आधारित पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक योजना तयार होण्याची चाहूल जरी कुणाला लागली तरी त्यात 'खो' घालणारे स्थानिक पुढारी आणि शासनाचेच अधिकारी असतात, आणि या सर्वांवर मात करून जर ती योजना मार्गी लागली तर ती केवळ २-३ वर्षेच टिकते असा पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचा अनुभव आहे. गावकीच्या मालकीच्या विंधन विहिरीतले पाणी स्वत:च्या खाजगी विहिरीत कसे येईल हे पाहणारे त्याच गावातील परंपरेने मान्यता पावलेले पुढारीच असतात. हे मान्यताप्राप्त पुढारी इतके चालाख असतात की, गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरने सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. टँकर त्यांचे स्वत:चेच असतात. आणि तेच पुढारी टँकरमुक्त गाव झाला पाहिजे या मोर्चाच्या अग्रभागी ही असतात. सरकारमान्य टँकरही त्यांच्याच मालकीचा बनतो, कुठे टॅकर पाठवायचा आणि कुठे नाही या गोष्टी तो त्या त्या गावाशी असलेल्या त्याच्या वैयक्तिक संबंधावर ठरवतो. सर्वसामान्य जनता याविरुद्ध उठाव करीत नाही. तेवढी तिची ताकदं नाही किंवा तिच्यातील शक्तीची तिला





अन्वयार्थ ११७