पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किती पाणी आहे असं उपरोधानं बोललं जातं. देशमुखांच्या या पाणीदार कथांची व्यथा आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ करणारी आहे. पाणी हीच मध्यवर्ती संकल्पना घेऊन अनुभवाचं अधिष्ठान असलेल्या या कथांमधून मानवी मनाचे, व्यवस्थापनाचे, लहरी हवामानाचे अनेक पैलू आपल्याला जाणवतात. 'भूक बळी' आणि 'नारूवाडी' यासारख्या कथांमधून जाणवणारी पाण्याची दाहकता, शासकीय पातळीवरची संवेदनशीलता आणि अनास्था याचे एकाच वेळी दर्शन घडवते. राजकीय दबावगटाचे बळी ठरलेले अनेक शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपापल्या मूकसंवेदना घेऊन जगत आहेत, याचं विदारक दर्शन जेव्हा या कथांमधून होते तेव्हा पाण्याच्या बाबतीत “कुठे आणून ठेवला महाराष्ट्र माझा" असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. देशमुखांच्या नजरेतून तहानलेला महाराष्ट्र कथांच्या माध्यमातून समजून घेताना विशेष करून शेतकरी आणि शेतकामगार महिला-पुरुष यांच्यातील संवेदनशील द्वंद्वाची तीव्र जाणीव होते, त्याचबरोबर काही कथांमध्ये निर्दय प्रशासनाचाही गलथान कारभार देशमुख चव्हाट्यावर मांडतात. स्वतः एक उत्तम संवेदनशील प्रशासकीय अधिकारी असलेले देशमुख या तहानलेल्या महाराष्ट्रासाठी कासावीस होतात. प्रशासनातील आणि प्रशासनाबाहेरही जाणीव-जागृती व्हावी, सहकारी योजनांचा मानवी चेहरा लाभून त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा इतपत पाणीसाक्षरता प्रशासनामध्ये घडवून आणण्यात देशमुख आग्रही असल्याचे त्यांच्या कथांमधून प्रकर्षाने दिसते.
 पाणी चोर, मृगजळ, अमिना या कथा वाचताना पाण्याच्या व्यवस्थापनाची दुर्दशा लक्षात आल्यावाचून राहात नाही. वाळवंटात किंवा कमी पावसाच्या प्रदेशात इतर जीवांप्रमाणे माणूसही पाणी साठवतो, घरांवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब साठवण्याची व्यवस्था राजस्थानच्या काही भागात केलेली आढळते. कारण या साठ्याच्या जोरावरच अतिउष्ण आणि अति कोरड्या वातावरणात तग धरायचा असतो. वाळवंटात हे आवश्यकच आहे. पण सृष्टीतील इतर जीवांचा विचार न करता जिथे कमी पाऊसमान आहे तिथे विविध उपाय योजून पावसाचा थेंब थेंब का साठवला जात नाही? अस्तित्वासाठी निसर्गात इतर जीवही पाणी साठवतात, त्याचा अन्य पिकांवर विशेष परिणाम होत नाही. माणसांमुळे मात्र तसं होतं, कारण छोटं गाव असो, वा खेडे - सर्वजण शासनाने काहीतरी करावे या अपेक्षेत उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचंही संरक्षण करण्याचं भान सोडून देतात.
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील कथांमधून माणुसकीचे भावपूर्ण दर्शन घेत असतानाच एका बाजूला माणसातील पशुत्वही पाणीप्रश्न हाताळताना वाचकाला थेट भिडते, स्वत:च्या जीवापेक्षाही पाण्याला जपणारे कथानायक वेळप्रसंगी पाण्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहात नाहीत, रोजगार हमी योजनेवरील कामगार आणि


११६  अन्वयार्थ