पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तळ्याखालून असलेल्या कातळातून दीडशे फुटांवर पाणी लागते आणि साऱ्या गावाला जणू नवे जीवन मिळते. 'कृष्णामाई, मी माहेरी येईन तेव्हा खणानारळाची ओटी भरेन. लग्नानंतर तुला पारखी झालेय असे वाटले होते, पण इथं खडकातही तुझी कृपा मला न्हाऊ घालतेय. तू माऊली आहेस माझी!' असे भक्तिभावाने सुनंदा म्हणते. (खडकात पाणी)
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथांमधील वास्तवतेमुळे पाणी प्रश्नांची वेगवेगळी अंगोपांगे समोर येतात. शासकीय अधिकाऱ्यांच्या व नोकरशाहीच्या संमिश्र कार्यपद्धतीमुळे आणि राजकारणी लोकांच्या हितसंबंधांमुळे या समस्येची सोडवणूक होणे हे जवळजवळ दुरापास्त आहे. नैराश्याचे ढग मनावर रेंगाळावेत, असाच या कथांचा रोख आहे. वास्तव घटनांचा आधार असल्यामुळे काही कथा केवळ हकिगतीच्या पातळीवरच घोटाळतात. आयुष्यात आगेमागे असतात. दैवदुर्विलास असतो, विसंगती असतात. काव्यात्म न्याय असतो. तरी 'कथा' हा एक वाङ्मयप्रकार आहे. काही तंत्रमंत्र वापरल्याने आपल्या आशयाचा बहुपेडीपणा हा अधिक सूक्ष्म तरल पातळीवर नेता येतो, त्यांच्या आवाहकतेची क्षमता वाढू शकते, मानवी मनाची काही अनोखी बाजू त्यामुळे एकदम झळाळून जाते. उपलब्ध परिचित व ज्ञात घटनाप्रसंग प्रतिभेच्या परिसस्पर्शाने नवनवोन्मेषशाली अर्थवत्तेने सुवर्णमय बनतात. लक्ष्मीकांत देशमुख थोड्यापार चिकाटीने अशा सुवर्णाच्या राशी वाचकांपुढे सहज ठेवू शकतील, असे वाटते.








११४ अन्वयार्थ