पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देण्यापूर्वीच पाण्यात जाणार, आपल्या उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले जाणार, म्हणून हा जवान व्यथित होतो. तो तहसीलदाराला भेटतो. तो तहसीलदार, डेप्युटी इंजिनिअरने मूळ प्लॅनमध्ये केलेल्या बदलीची नोंद घेतो. सरपंच दाजीबाला दम भरतो. महादेववर बहिष्कार टाकणाऱ्या गावकऱ्यांना समजावतो. महादेव कलेक्टरना भेटतो. कलेक्टरही माजी मेजर असतात. ते महादेववरचा अन्याय दूर करतात. पण दाजीबा हायकोर्टकडून स्टे मिळवतो. आलेला मेजरचा आदेश फिरवतो. महादेव सुन्न होतो.
 कंडम' ही कथा एकीकडे पाण्याच्या टंचाईने गावात होणारे वाद प्रकट करते; दुसरीकडे एका दलित म्हातारीच्या मृत्यूने उडालेला गोंधळ स्पष्ट करते.
 'भूकबळी' झाल्याची बातमी आल्यावर शासनयंत्रणा कशी खडबडून जागी होते, याची एक झलक 'भूकबळी' आणि 'हमी? कसली हमी?' या दोन कथांमधून दाखवण्यात येते.
 वृत्तपत्रात आलेली बातमी वाचून कलेक्टर झोपेत असलेल्या तहसीलदार शिंदेना सकाळीच फोन करतात आणि ती बातमी माहीत नसलेल्या शिंद्यांची झोप खाड्कन उडते. 'दुष्काळाचे अर्थशास्त्र आणि व्यावहारिक उपाययोजना' यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवण्याची उमेद धरणारे भावनाप्रधान शिंदे मग संबंधितांकडून माहिती मिळवतात. काळगाव दिघीची एक महिला ठकूबाई हिचा खरोखर भुकेने बळी पडलेला असतो. जवळ धान्याची कूपन्स व पैसे असूनही यामागची नोकरशाहीची नाठाळ आणि व्यवहारशून्य चालही अशी कागदोपत्री भरभक्कम असते की, तिच्यातून कोणावर ठपका ठेवणे शक्य होऊ नये. पत्रकार विसपुते या भूकबळीची बातमी प्रथम देतो. संबंधित ठकूबाईच्या भावाला, रघूला, साहेबांपुढे उभे करतो. कामासाठी दूरवर जावे लागते. रेशनचे दुकान लग्नामुळे बंद असते. खायला काही न मिळाल्याने ठकूबाई रस्त्यातच दम तोडते. रोजगार हमी कामाची माहिती तपासण्याची यंत्रणा नसल्याने गावात काम चालू असूनही राघूला परगावी पाठवण्यात येते. तहसीलदार शिंदे या भूकबळीला एक शासकीय अधिकारी म्हणून आपण जबाबदार आहोत, असे मानतात. त्यांच्या ऑफिसातले जुने कर्मचारी भालेराव त्यांना सांगतात, “आपण नुकतेच या खात्यात आला आहात सर! हा पहिलाच क्रायसिसचा प्रसंग आहे. पण इथं टफ झालंच पाहिजे. यानंतर कुणापुढे ठकूबाईंचा भूकबळी झाला, असं म्हणू नका. ती अतिश्रम - आजारानं मेली, असाच रिपोर्ट आपण द्यायचा. मी तो तयार करतो व तो सारे जण मान्य करतील. कोणीही आक्षेप घेणार नाही, याची मी गॅरंटी देतो."
 तसा तो रिपोर्ट तयार होतो, पण शिंद्यांना तो केवळ शब्दांचा खेळ वाटतो.
११२ अन्वयार्थ