पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना


 १९८० नंतरच्या काळात मराठी वाङ्मयीन पर्यावरणात अनेक नवे बदल घडत होते. लघुनियतकालिक चळवळ विसावली होती. अस्मिताकेंद्री वाङ्मयीन चळवळीना नवा अवकाश प्राप्त झाला होता. चळवळप्रेरित वाङ्मयीन आविष्काराचे जोरकस धुमारे अवतीर्ण होत होते. अशा वाङ्मयीन पर्यावरणात लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली. आपल्या संवेदनशीलस्वभावाला अनुसरून त्यांनी लेखनाचे अग्रक्रम ठरविलेले दिसतात. ते ज्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ वावरले अशा जीवनक्षेत्रांतून त्यांना अनेक विषय स्फुरलेले दिसतात. मानवी जीवनाला व्यापून असणाऱ्या राजकीय सत्रासंबंधाचे व भोवतालच्या समाजचित्रणाला साकार करणारे लेखनविषय त्यांच्या साहित्यातून प्रकट झाले आहेत. प्रशासकीय काम करत असताना ज्या सामाजिक कार्याशी त्यांचा संबंध आला अशा कामाच्या प्रेरणेतून अनेक कथा - विषय प्रकटलेले दिसतात.
 देशमुख यांच्या एकूण लेखनकामगिरीचा धांडोळा घेणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथात देशमुख यांच्या साहित्यविषयीची मांडणी करणाऱ्या विविध लेखांचा समावेश करण्यात आला आहे. देशमुख यांच्या साहित्याचा अन्वयार्थ मांडणारे हे लेख आहेत. कथा, कादंबरी व त्यांच्या प्रशासनविषयक लेखनाचा लेखा-जोखा या ग्रंथात आहे. या ग्रंथासाठी मराठीतील नामवंत विचारवंत, लेखक व अभ्यासकांनी लेख लिहिले आहेत. ललित लेखकापासून ते सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांनी लिहिलेले हे लेख आहेत. तीन पिढ्यातील विविध समीक्षकांच्या नजरेतून देशमुख यांच्या लेखनाचे पुनर्वाचन केलेले आहे आणि लेखक, त्याचा संवेदनस्वभाव त्यांच्या चित्रणाचे आथाविषय लेखनसामर्थ्यचे विविध अन्वयार्थ अभ्यासकांनी लावलेले आहेत. या ग्रंथासाठी बरेचसे लेख नव्याने लिहिले गेले आहेत, तर काही त्या त्या काळात प्रकाशित झालेल्या नियतकालिकातील परीक्षणांचाही समावेश केला आहे.

 लक्ष्मीकांत देशमुख यांचे एकूण सहा कथासंग्रह प्रकाशित आहेत. १९८३ साली त्यांचा 'कथांजली' हा संग्रह प्रसिद्ध झाला. तर २०१३ साली 'सावित्रीच्या

अन्वयार्थ ० ११