पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथा कितीतरी प्रश्नांना पुन्हा उभी करून जातीपाती राजकारण, केवळ पैसा म्हणजे पैसा, कशा विकृतपणानं चाललेलं आहे हे सांगते. 'मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं', अशी म्हण आहे. 'जिवंत माणसांना मरणदारी उभं करून लोणी खाणं' असं इथे आहे. राजकीय पक्षापक्षातल्या किती पुरोगामी - प्रतिगामी - परिवर्तनवादी अशा घट्ट भिंती एकसंध हा देश अशा कण्याकण्यांनी चिरून जातो आहे आणि म्हणूनच विकल होतो आहे याची कोणालाही खंत नाही. विकासाची खरी किल्ली व त्याला पुढे छेदून जाणं हे राज्यकर्त्याच्या पेक्षाही दीर्घकाळ त्या सेवेत असणाऱ्या निष्ठांवत चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाती आहे असं माझं मत आहे. जिल्हाधिकारी भावे व त्यासारखे अनेक अधिकारी तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत मी जवळून पाहिले. त्यांचं कथेतल्यासारखं झाल्यावर किंवा त्यापेक्षाही भयानक शिक्षा त्यांना दिलेली मी पाहिली. विकास कामं सोडाच पण ही दु:खाची कुरतड पार भेदून टाकणारी खेडी, तिथला माणूस हा निष्पर्ण झाडासारखा उभा आहे. असं हे सत्य व वास्तव. अमीनचं दुःख, प्रज्ञाचं दुःख हे हृदयाला तडे पाडणारं आहे. आणि ते वाढतच चाललेलं. अमीनाची मुलं, प्रज्ञाची वहिनीसाठीची धडपड व अतिशय बोंगळ सोसणं हा कुठला समाज व स्वातंत्र्य? 'दुष्काळ आणि पाणी' तिथली शेतीवाडी आणि समाज पायगुणामुळे असं म्हटलं तरी खेड्यात अजूनहि भूगर्भ पाणी, वनस्पती आणि खूप काही चांगलं विज्ञान अडाणी म्हणवणाऱ्या खेड्यातल्या माणसांजवळ आहे. हे मीही पाहतो आहे. कंडममध्ये खडकातून निर्माण झालेलं पाणी हे शास्त्र थोडंबहुत नीट माहीत असलेले आहे. पाण्याचं नवं तंत्रज्ञान भूगर्भ यासह खेड्यातल्या जी थोडी अशी माणसं आहेत त्यांना घेऊन नक्कीच काही करता येईल, पण ते सातत्यानं होत नाही आणि पाणीप्रश्न सुटत नाही असं चक्र आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहात, शेती, शेतकरी, पाणी टंचाई, गावगाडा आणि शासकीय यंत्रणेसंबंधी परवडीच्या कथा आहेत. आज उजाड होत चाललेली खेडी आणि तिथलं माणसांचं जिकिरीचं जगणं लेखकानं विविध कथांमधून समर्थपणे मांडलेलं आहे. आज पाणी प्रश्नानं सगळ्यांची झोप उडविलेली आहे. अशा वेळी श्रीमंत धनदांडग्यांनी गरिबांचे पाणी पळवणे, फळबाग योजनेचा मलिदा काहींच्याच पदरी पडणे, रोजगार हमी योजनेत घाम गाळणाऱ्या स्त्री जातीची होणारी घुसमट, भूकबळी झालेल्या ठकूबाईंना कागदपत्राच्या आधारे आजारी ठरविणे - सर्वच मार्गांनी पैसा कमवण्याची, सर्व क्षेत्रातल्या बहुसंख्य माणसांना नशा. दोन घोट पाण्यासाठी म्हातारीला जीव गमवावा लागणे; पाण्यापेक्षाही गावाच्या आरोग्याची परवड होणे, आणि सर्वच क्षेत्रातल्या ध्येयवाद्याची आज होणारी गोची, हे एक समान कथासूत्र लेखक विविध कथावृत्त सांगतो आहे.

१०८ अन्वयार्थ